भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ‘भारतीय महिलांची प्रतिमा डागाळण्यासाठी दुबईतून पैसा पुरवला जात आहे’ असा गंभीर आरोप करत या चित्रपटाच्या आर्थिक स्त्रोतांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकंदरित आतापर्यंत संजय लीला भन्साळी, तसेच अन्य दिग्दर्शक, निर्माता यांनी चित्रपटाच्या माध्यमातून केलेले इतिहासाचे विकृतीकरण, त्यातून दिलेला संदेश, ‘बॉलीवूड’ आणि ‘अंडरवर्ल्ड’ यांचे असलेले नाते डॉ. स्वामी यांच्या आरोपांना पुष्टी देणारे आहेत. चित्रपटासारख्या माध्यमाचा समाजावर मोठा परिणाम होत असतो; म्हणूनच अभिव्यक्ती अथवा कला स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना वेळीच चाप बसणे आवश्यक आहे.
पद्मावती चित्रपटातील घूमर गाण्यात राणी पद्मावतीला नाचतांना दाखवण्यात आले आहे. घूमर हा नाच राजस्थानी संस्कृतीतील एक नृत्यप्रकार आहे. तो नाच करणारा एक विशिष्ट समाज आहे. कोणत्याही राजकन्या वा राण्या या नाच करत नव्हत्या. घूमर नाचच दाखवायचा होता, तर त्या ठिकाणी कुणीही कलाकार नाचताना दाखवता आले असते; पण कुलीन राणीला नाचतांना दाखवणे हा राणी पद्मावतीचा अवमानच आहे. अशाच प्रकारे बाजीराव मस्तानी चित्रपटातही बाजीरावांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना पिंगा गाण्यावर अंगप्रदर्शन करत एकत्र नाचतांना दाखवले गेले होते. भन्साळी यांनी गाणे दाखवतांना ऐतिहासिक तथ्य आणि तर्क यांचा आधार घेतला नसेल, तर चित्रपटामध्ये अन्यत्र (भन्साळी यांच्या म्हणण्याप्रमाणे) राजपूत मानमर्यादा सांभाळली गेली आहे, यावर कोण विश्वास ठेवणार ? स्वतःच्या शीलरक्षणासाठी जोहार (अग्निसमर्पण) करणार्या पद्मावतीला नाचतांना दाखवणे, हा हिंदु वीरांगनांचा अवमानच नव्हे का? या निमित्ताने जावेद अख्तर, तसेच कथित इतिहासतज्ञ इर्फान हबीब यांचाही ‘राणी पद्मावती हे काल्पनिक पात्र होते’ असे वक्तव्य करून हिंदूंना भ्रमित करण्याचा प्रयत्न होत आहे. राणी पद्मावती काल्पनिक म्हणणार्यांनी समलैंगिकतेचा आरोप असलेला वासनांध आणि हिंदुद्वेष्टा अल्लाउद्दिन खिलजी कोण होता आणि त्याने चित्तोडवर स्वारी का केली, हे स्पष्ट करण्याचे कष्ट घ्यावेत.
चित्रपटाचा भरकटलेला उद्देश
मराठ्यांच्या इतिहासात बाजीराव पेशवे यांना अपराजित योद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारा पराक्रमी सेनानी म्हणून स्थान आहे. अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात एकही युद्ध न हरलेल्या बाजीरावांची खरी ओळख त्यांचा पराक्रम, नियोजनकौशल्य, दूरदृष्टी ही आहे. मस्तानी बाईसाहेब हा तर त्यांच्या आयुष्यातील एका भाग होता; मात्र एक योद्ध्या पुरुषाला प्रेमवीर म्हणून रंगवण्याच्या प्रयत्नांतून भन्साळी यांचा इतिहासाकडे पहाण्याचा दृष्टीकोन किती कच्चा आहे, हे दिसून येते. अशा प्रकारे हिंदू वीरांच्या शौर्याची अवहेलना, धर्मांध आणि वासनांध आक्रमकांचे सौम्यकरण किंवा उदात्तीकरण पद्मावती चित्रपटातून होणार नाही, याची शाश्वती काय?
भन्साळी यांनी ज्याप्रमाणे केवळ डिस्क्लेमर दाखवून बाजीराव-मस्तानी चित्रपटात त्यांच्या ऐतिहासिक घोडचुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न पद्मावती चित्रपटामध्ये सहन केला जाणार नाही; कारण संजय भन्साळी इतिहास आणि संस्कृती यांच्या करत असलेल्या भेसळीविषयी समाज जागृत होऊ लागला आहे. विद्रुप कलाकृतींचे निर्माते, कलाकार आणि अन्य संबंधित व्यक्ती, यंत्रणा यांवर सामाजिक बहिष्कार घालणे, हा एकच पर्याय जनतेसमोर आहे. सामाजिक लढ्यातूनच अशा विकृतींना पायबंद बसेल आणि हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाच्या पायावर वर्तमानाला दिशा देत चांगले भविष्य निर्माण करणार्या कलाकृतींना चालना मिळेल.
– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387