मुंबई । संजय लिला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ या बिग बजेट हिंदी चित्रपटाला कडाकडून विरोध होत असताना आता ‘न्यूड’ आणि ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटांनाही विरोध होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) ‘न्यूड’ आणि ’एस दुर्गा’ हे दोन चित्रपट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वगळल्याने त्याचे चित्रपटसृष्टीत चांगलेच पडसाद उमटले. कोणतीही पूर्वसूचना न देता हे चित्रपट वगळण्यात आल्याने ‘एस दुर्गा’चे दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय व इफ्फीच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, अशी ‘न्यूड’चे दिग्दर्शक रवी जाधव यांनीही मुंबई उच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे ‘दशक्रिया’ चित्रपटाला बाह्मण महासंघाचा विरोध कायम आहे.
रवी जाधव यांनीही सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मुंबईत न्यूड मॉडेल म्हणून काम करणार्या एका स्ट्रगलर महिलेची ही कथा आहे. त्यात वाईट असे काहीच नाही. त्यामुळे हा सिनेमा महोत्सवात दाखवायला हवा होता. सिनेमा वगळण्याचे काही तरी कारण द्यायला हवे होते. पण काहीच कारण देण्यात आलेले नाही. हा माझ्यासाठी एक धक्काच असून माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इफ्फीच्या निर्णयाने मी प्रचंड निराश झालो आहे,’ असे जाधव म्हणाले.
दशक्रियाचा वाद चिघळला
’दशक्रिया’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाविरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ उभा ठाकला आहे. हा चित्रपट ब्राह्मणांची व हिंदू प्रथा-परंपरांची बदनामी करणारा असून त्याच्या प्रदर्शनास मनाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा व त्या अनुषंगाने अनेक जुनाट बाबींवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आले आहे.