भोर । पद्मावती येथील रहिवाशांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सर्व कर भरूनही नागरी सुविधा मिळत नसल्याने भोर तालुका युवा सेनेचे प्रमुख आणि भोर नगरपालिकेचे माजी नगरसेवक केदार देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली येथील नागरिक, महिलांनी सोमवारी नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढला होता.
पद्मावतीवस्तीवर 25 ते 30 घरे आहेत. येथील 150 ते 200 नागरीक घरपट्टी, पाणीपट्टी, शिक्षण कर, वृक्ष कर वेळेवर भरत आहेत. तरीही एकही नागरी सुविधा भोर नगरपालिका प्रशासनाने त्यांना पुरवलेली नाही. नगरपालिकेच्या या आंधळ्या कारभाराविरुद्ध तसेच नागरिकांच्या हक्काच्या मुलभूत मागण्यांसाठी हंडा मोर्चा काढण्यात आला होता. नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे आणि नगराध्यक्ष तानाची तारु यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, पोकळ अश्वासने नकोत, तर मागण्या पूर्ण करण्यासाठी लेखी हमी द्या. तरच आम्ही येथून ऊठू, असा पवित्रा युवा सेनेचे तालुकाप्रमुख केदार देशपांडे यांनी घेतला होता.
युवा सेनेचे तालुकाप्रमुख केदार देशपांडे यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी आवाश्यक असणार्या प्रश्नांची दिलेल्या मुदतीत पुर्तता न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भोर नगरपालिका प्रशासनास दिला आहे. भोर नगरपालिका शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, शहराचाच एक भाग असलेल्या पद्मावती नगरावर अन्याय का? असा सवाल यावेळी आंदोलक महिला, पुरुष विचारत होते.
मागण्या मंजूर करण्याचे लेखी आश्वासन
नगराध्यक्ष तानाजी तारु यांनी सकारात्मक भूमिका घेऊन पद्मावतीनगराला भोर नगरपालिकेच्या पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाईनमधून 2 इंची पाईपलाईनमधून त्वरित पिण्याचे पाणी पुरवले जाईल, अंगणवाडी सुरू करण्यासाठी ठराव करू, रस्त्यासाठी जमीन संपादित करून पक्का रस्ता तयार करू, रस्त्यावर तात्काळ पथदिवे लावू. ही सर्व व्यवस्था 10 दिवसांत सर्वसाधारण सभेत ठराव मांडून मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्याचबरोबर मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनीही यावेळी आंदोलकांशी चर्चा करून अध्यक्षांच्या मान्यतेने समस्या मार्गी लावण्याचे लेखी अश्वासन दिले.