श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा आणि काही वाचाळांनी पद्मावती चित्रपटाचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न मागील काही महिन्यांपासून सातत्याने सुरू ठेवला आहे. एक चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून संपूर्ण देशात रान उठविले जाते. ही मेक इन इंडियाला लाजिरवाणी बाब आहे. चित्रपटाची कथा, संवाद, दृष्ये याबाबत काहीच माहित नसणार्यांनीही अगदी पोटतिडकीने विरोध सुरूच ठेवला आहे. आक्रमक झालेल्या करणी सेनेकडून तर जाळपोळीसारखे हिंसकप्रकार काही ठिकाणी अजूनही सुरू आहेत. तरीही केंद्रातील एकही जबाबदार नेता शांतता राखण्याचे आवाहन करताना दिसत नाही. उलट चिथावणीखोर वक्तव्य सुरू असल्याचे दिसते. चित्रपटाला विरोध करणार्यांना न्यायालयाने यापुर्वीच सणसणीत चपराक दिली असून अशा वातावरणात प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक तो बिनधास्त पाहू शकतील का?
भन्साळींचा चित्रपट म्हणजे तो भव्य असणारच. प्रेक्षक त्यांचा चित्रपट यासाठीच पाहात असतात. पद्मावत चित्रपटही अगदी तसाच आहे. बुधवारी या चित्रपटाचा खास स्क्रिनिंग शो पार पडला. समिक्षकांनी तर चित्रपटाची आणि भन्साळींची इतकी वाहवा केली आहे की, पद्मावत पाहायलाच हवा, असे प्रत्येकाला वाटावे. पद्मावतमध्ये काहीही वावगे नाही. सिनेमाची मांडणी आणि कथानकात असलेली ताकद याचे सोने करणारा हा सिनेमा, अशा शब्दात समीक्षकांनी चित्रपटाला दाद दिली आहे. मग, इतके दिवस करणी सेनेने आणि काही लोकांनी जो गोंधळ घातला होता तो नेमका काय पाहून? एकाने विरोध केला म्हणून दूसरा त्याच्या पाठीशी उभा राहतो. नेमकाविरोध का? हे मात्र कुणालाच माहित नसते. अशा मुर्ख लोकांमुळे पद्मावतसारख्या सुंदर कलाकृतीला अनेक कट द्यावे लागले. पद्मावतीनंतर पद्मावत असे नावही बदलावे लागले होते. आपल्या देशात अशाप्रकारे आंधळाविरोध करून राजकारण करण्याची सवयच अनेकांना जडली आहे. पद्मावतीचे चित्रीकरण सुरू असल्यापासून भन्साळी यांना हिंसकस्वरूपाचा त्रास दिला गेला. किंमती सेट उद्ध्वस्त करून आर्थिक नुकसान केले गेले. मात्र, या चिकाटीच्या दिग्दर्शकाने आपले काम थांबवले नाही. गुंडशाहीला भीक घातली नाही. या धाडसाबद्दल भन्साळी यांचे अभिनंदन. चित्रपटाचे सर्व चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. काही समाजकंटकांनी तर दीपिका पदुकोण, संजय लीला भन्साळी यांना ठार मारण्यासाठी बक्षीस जाहीर केले होते. इतकेच नव्हे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही मारण्याची धमकी काहींनी दिली होती. देशात असा तमाशा सुरू असताना आपले आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेते मात्र गप्प होते. सेन्सॉर नावाच्या चौकडीचेही पद्मावतीच्या निमित्ताने पितळ उघडे पडले ते बरे झाले. सेन्सॉरने या चित्रपटाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे अपेक्षीत होते. मात्र, दुर्दैवाने तसे घडले नाही. सेन्सॉरपुर्वी आणखीकाही सेन्सॉर नेमण्यात आले होते. त्यांनी या चित्रपटाचे आधी परीक्षण केले. असे होत असेल तर सेन्सॉरची गरजच काय? सध्या तर समिती आणि सेन्सॉरनेही पद्मावतला हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायालयाने तर विरोध करणार्यांना आणि बोलघेवड्यांना सक्त ताकीद दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही काहीजण हिंसक होऊन रस्त्यावर गोंधळ घालत आहेत. मुळात राणी पद्मावतीची कथाच काल्पनिक आहे, असे मत मांडणाराही एक वर्ग आहे. तर, काहीजण राणी पद्मावती म्हणजे आमचा स्वाभीमान असल्याचे म्हणतात. मात्र, त्यांच्याकडेही या कथेबद्दल काही ठोस पुरावे आहेत किंवा नाही, याबद्दल शंकाच आहे. न्यायालयाने सर्व राज्यांना चित्रपट प्रदर्शित होऊ देण्याचे सक्त आदेश दिले आहेत. नको तिथे नाक खुपसण्याचा प्रयत्न करणार्या राजस्थान व मध्यप्रदेश सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालय आपल्या निर्णयात काहीही बदल करणार नाही, तेव्हा राज्यांनी आदेशाचे पालन करावे. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व अखिल भारतीय क्षत्रिय महासभेलादेखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की हा चित्रपट इतिहासाशी छेडछाड करत नाही. तज्ज्ञांनी हा सिनेमा पाहिला असून, तशी सूचनादेखील प्रदर्शित होणार आहे. ज्यांना काही आपत्ती असेल तर त्यांनी हा सिनेमा पाहू नये, अशा शब्दांत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी याचिका दाखल करणार्यांना सुनावले होते. प्रदर्शनाच्यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारीही राज्यांची असणार आहे. न्यायालयाने असे बजावूनदेखील काही राज्यांचे मंत्री वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुतेक हे अतिशहाणे मंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वत:ला मोठे समजत असावेत. अशा मंत्र्यांवर आता न्यायालयाने स्वत:हून कारवाई करायला हवी. करणी सेनेलाही आपण न्यायालयापेक्षा मोठे आहोत असे वाटू लागले आहे. म्हणूनच या संघटनेने न्यायालयाचा अवमान करत; विरोध कायम ठेवून रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. करणी सेनेने एक चांगले केले, ते म्हणजे त्यांनी देशात चित्रपटावरून सुरू असलेला गोंधळ शांतपणे पाहणार्या सत्ताधार्यांना सुनावले, काहीतरी बोला, विरोध की पाठींबा.
राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र अतिशय चांगली आणि स्पष्ट भूमिका पद्मावतच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने घेतली आहे. पद्मावत चित्रपटाला मनसेने पाठींबा जाहीर केला असून वेळ पडल्यास सर्व संरक्षण देण्याचेही आश्वासन दिले. मनसे व्यतिरिक्त एकाही राजकीय पक्षाने अशाप्रकारे आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेला पाठींबा हा एका कलाकृतीला दिलेला पाठींबा आहे. त्यांच्या या भूमीकेचे आम्ही स्वागत करतो. तसेच कलाकृती आणि इतिहास यांची सरमिसळ न करता चित्रपटप्रेमींनी, कलाप्रेमी नागरिकांनी तंत्रज्ञान आणि कलात्मकता यांची अद्वितीय सांगड असलेला पद्मावत जरूर पाहावा. अन्यथा, एक चांगली कलाकृती पाहण्यापासून आपण वंचित राहू. ज्यांना विरोध करायचा आहे, त्यांनी खुशाल करावा. चित्रपट पहायचा नसेल, त्यांनी पाहू नये. आम्ही पद्मावत पाहिला…तुम्ही?