‘पद्मावत’ बकवास, बघू नका!

0

ओवेसींचे मुस्लिमांना आवाहन

हैदराबाद : संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त चित्रपट ‘पद्मावत’भोवती घोंघावणार्‍या वादात आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेतली आहे. पद्मावतसारखा बकवास चित्रपट न पाहण्याचे आवाहन ओवेसी यांनी मुस्लिमांना केले. आंध्रप्रदेश येथील वारंगल शहरात झालेल्या एका सभेत ते बोलत होते. हा एक गलिच्छ व अपशकुनी चित्रपट आहे. मुसलमानांनी तो पाहू नये, असे ओवेसी म्हणाले.

मोदींवरही साधला निशाणा
जाहीर सभेत या चित्रपटाला अतिशय वाईट ठरवत असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना तो न पाहण्याचे आवाहन केलेे. अल्लाने तुम्हाला दोन तासांचा हा टुकार चित्रपट पाहण्यासाठी बनवलेले नाही. अल्लाने तुम्हाला असे काम करण्यासाठी बनवले आहे, ज्यामुळे लोकांच्या लक्षात राहाल. तेव्हा त्याच्यावर पैसे खर्च करू नका, असेही ओवेसी म्हणाले आहेत. पद्मावतवरून ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी या बकवास चित्रपटासाठी 12 लोकांचे पॅनेलसुद्धा बनवले होते. खरेतर हा चित्रपट 1540मध्ये कवी मलिक मोहम्मद जायसीने लिहिलेल्या गोष्टीवर आधारित आहे आणि तो संपूर्णतः काल्पनिक आहे. तरीही मोदी सरकार या चित्रपटात इतका रस दाखवत आहे, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.

मुस्लिमांनी राजपूतांकडून शिकावे!
आपल्या राणीच्या सन्मानासाठी संघर्ष करणार्‍या राजपूतांकडून मुस्लिमांनी शिकले पाहिजे. ’पद्मावत’ प्रदर्शित होऊ नये म्हणून ते एकजुटीने उतरले आहेत. त्यांची एकजूट हा आपल्यासाठी धडा आहे. कारण, मुस्लीम दुभंगलेले आहेत. इस्लामिक कायद्यात बदल होत असताना ते साधा आवाजही उठवत नाहीत, असेही ओवेसी म्हणालेत.