नाव बदलले, दृष्ये कापली तरीही चार राज्यांत बंदी
नवी दिल्ली : रजपूत समाजासह हिंदू संघटनांकडून झालेल्या जोरदार विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘पद्मावत’ सिनेमाचे शुक्लकाष्ठ काही संपत नाही. नाव बदलले, काही दृष्येही कापण्यात आली, तरीही या चित्रपटाला चार राज्यात बंदी आहे. येत्या 25 जानेवारीरोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. मात्र 4 राज्यांनी या चित्रपटावर बंदी घातल्यामुळे निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात येथे या चित्रपटांवर बंदी घातल्यामुळे चित्रपटाला तोटा होवू शकतो, त्यामुळे निर्माते न्यायालयात गेले आहेत.
चित्रपटाचा मार्ग रखडलेला!
हरियाणा राज्यात पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, अशी माहिती नुकतीच हरियाणा सरकारने जाहीर केली आहे. काल हरियाणा येथे राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांचा सगळ्यात वादग्रस्त चित्रपट ‘पद्मावत’ हा ठरला आहे. ‘पद्मावती’ हे नाव बदलवून या चित्रपटाचे ‘पद्मावत’ नाव ठेवण्यात आले; तसेच ‘घुमर’ गाणेदेखील या चित्रपटातून वगळण्यात आले, मात्र इतके सगळे करूनदेखील या चित्रपटाचा मार्ग मोकळा झालेला नाही. 16 व्या शतकातील सुफी कवी मलिक मोहम्मद जयसी यांच्या प्रसिद्ध ’पद्मावत’ या काव्यावर आधारित या चित्रपटांला सुरुवातीपासूनच टीकेला सामोरे जावे लागले. मात्र आता अखेर अनेक अडचणींनंतर तसेच प्रेक्षकांच्या खूप वाट पाहण्यानंतर पद्मावत येत आहे.