आधी दिला होता पाठिंबा, आता तटस्थ भूमिका!!
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पद्मावत सिनेमावरूनही कोलांटउडी मारली आहे. पद्मावत सिनेमाला संरक्षण देऊ, अशी घोषणा केल्यानंतर आता करणी सेना आक्रमक झाल्यावर मनसेने यातून माघार घेतली आहे. पद्मावत चित्रपटाबाबत मनसेकडून अद्याप कुठलीही अधिकृत भूमिका व्यक्त करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकारने काय ते बघावे. मनसेचा याप्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशी माहिती पक्षाचे नेते आणि प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दिली.
विशेष म्हणजे महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी पद्मावतला पाठिंबा दिल्यास राज ठाकरे यांना काळे फासू, असा इशारा दिला होता. त्यानंतर मनसेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी पद्मावतच्या प्रदर्शनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते. यापूर्वी आम्हीही अनेक चित्रपटांना विरोध केला. मात्र, हा विरोध मुद्द्यांवर होता. चित्रपटाच्या आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही. त्यामुळे मनसे पद्मावतला संरक्षण देणार आहे, असे शालिनी म्हणाल्या होत्या.
पद्मावतला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टानेही पद्मावतला परवानगीरूपी दिलासा दिलेला आहे. असे असताना चित्रपटाला विरोध करणे चुकीचे आहे. तसेच चित्रपटाला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देणे हे तर त्याहून चूक असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. एकूणच मनसेचे प्रमुख आणि नेते यांच्यातच संवाद नसल्याने महत्वाच्या विषयावरून पक्षाला कोलांट्या उड्या माराव्या लागत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.