पिंपरी-चिंचवड : शास्तीकर, रेडझोन यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी गेल्या 10 वर्षांपासून मी भांडत आलो आहे. महापालिकेच्या सभागृहात गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच आवाज उठविला आहे. 100 टक्के शास्तीकर माफ करण्याची मागणी करत असताना, महापौर नितीन काळजे यांनी आमचे निलंबन केले. ही भाजपची हुकूमशाही आहे. आता महापौर माझे नगरसेवकपद रद्द करण्याची भाषा करत आहेत. मी काही लाटेत निवडून आलेलो नाही. जनतेने मला निवडून दिले आहे. भाजपने माझे नगरसेवकपद रद्द करून दाखवावेच, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी भाजपला दिले असून, आता निलंबनाच्या विषयावरून महापालिका वर्तुळात चांगलेच घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मी गैरवर्तन केलेले नाही
मी सभागृहात कोणतेच गैरवर्तन केलेले नाही. महापौरांच्या आसनाशेजारील कुंडी वरती ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा भलताच अर्थ काढण्यात आला. सभागृहात राजदंड पळवून नेल्यास गैरवर्तन होते; मी राजदंडाला हातदेखील लावला नाही. 100 टक्के शास्तीकर माफ करावा, या मागणीसाठी मी गेल्या 10 वर्षांपासून झगडत आहे. या विषयावर मतदान घेण्याची आमची मागणी होती. परंतु, महापौरांनी आमची मागणी मान्य केली नाही. यामध्ये कुरघोडीचा कोणताही प्रयत्न नव्हता. आमचा प्रामाणिक प्रयत्न होता, असेही दत्ता साने म्हणाले.
…तर मी न्यायालयात जाईल
मी जनतेचा नगरसेवक आहे. लाटेत निवडून आलेलो नाही. जनतेसाठी माझे दहा वेळेस नगरसेवकपद रद्द केले, तरी मला काहीच फरक पडत नाही. जनता माझ्यासोबत आहे. नगरसेवकपद रद्द करणे सोपे नाही. जर तसा प्रयत्न झाला तर मी न्यायालयात जाईल. भाजपला सभागृहात बोलणारे नगरसेवक नकोच आहेत. म्हणूनच अशारितीने हुकूमशाही सुरू असल्याची टीकादेखील साने यांनी केली.