पनवेलच्या प्रथम महापौरपदासाठी डॉ. कविता चौतमोल?

0

पनवेल: बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित पनवेल महापालिकेच्या निवडणुकीतील धक्कादायक निकाल समोर आल्यानंतर रायगड जिल्ह्यातील या पहिल्या प्रतिष्ठित महानगरपालिकेच्या महापौरपदावर कुणीची वर्णी लागणार यावर आता चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी सध्या भाजपच्या चार नगरसेविकांमध्ये चुरस सुरू लागली असून, यात डॉ. कविता किशोर चौतमोल यांचे नाव सर्वात पुढे आहे.

अडीच वर्षांसाठी या महापालिकेचे महापौरपद मागासवर्गीय महिलासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे भाजपच्या डॉ. कविता किशोर चौतमोल, संतोषी तुपे, विद्या गायकवाड आणि आरती नवघरे अशा चार नगरसेविकांच्या नावांची चर्चा महापौरपदासाठी सुरू झाली आहे. यात नगरसेविका विद्या गायकवाड ह्या पनवेलमधील राजकीयदृष्ट्या ताकदवान समजले जाणारे जगदीश गायकवाड यांच्या बहीण असल्यामुळे त्यांच्या नावावरही जोर दिसत आहे. याशिवाय आरती नवघरे आणि संतोषी तुपे या दोन नगरसेविकाही मागास प्रवर्गातून येतात. त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, या सर्वांच्या स्पर्धेत डॉ. कविता किशोर चौतमोल यांचे नाव सर्वात अग्रस्थानी आहे.