पनवेल: मावळ लोकसभा मतदार संघातील महाघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी पैसे वाटताना शेकापच्या कार्यकर्त्यांना दोन वेळा पनवेलमध्ये अटक करण्यात आली. ही घटना ताजी असताना आता शिवसेनेच्या कार्यकर्त्याला देखील भरारी पथकाने रंगेहात पकडल्याची घटना रविवारी घडली. पनवेल तालुक्यातील देवद याठिकाणी पैसे वाटताना सेनेच्या संजय हिरामण पाटील या कार्यकर्त्याला निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रंगे हात पकडले .त्याच्याकडून 26100 रोख रक्कम सापडली आहे . खान्देशवर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती भरारी पथक प्रमुख विनोद माहोरे यांनी दिली.
दरम्यान, मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करताना शेकापच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. सुकापूर इथं मतदारांना प्रत्येकी 200 रुपये वाटत असताना पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले. पनवेल भरारी पथकाने शेकाप पदाधिकाऱ्यांकडून 200 रुपयांची 29 पाकिटंही जप्त केली आहे. पैसे वाटण्याबाबत भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी शेकाप कार्यकर्त्यांवर कारवाई केली.