मुंबई : पनवेल, भिंवडी-निजामपूर आणि मालेगाव या तीन महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पनवेलमध्ये तर काँग्रेसने भिवंडीत एकहाती सत्ता मिळवली. मालेगावमध्ये मात्र, त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यामुळे तेथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करण्याची संधी मिलाली आहे.
या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. विरोधकांनी भाजपाचा अश्वमेध रोखण्यात काही प्रमाणात यश मिळवल्याचे दिसून आले. पनवेलमध्ये भाजपाने रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे तगडे आव्हान परतवले. भाजपाने पनवेल महापालिका आपल्या ताब्यात घेतली. राज्यात गेल्या काही काळात झालेल्या स्थानिक स्वरांज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला आश्चर्यकारक विजय मिळाले. मात्र, नगरपालिका ते पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा ते महापालिका असा प्रवास करताना अखेरच्या टप्प्यात मुस्लिमबहुल मालेगाव तसेच भिवंडीत काँग्रेसला मतदांरानी स्वीकारल्याचे दिसले.
पनवेलमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पनवेल महानगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलले आहे. रायगड जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या शेकापचे मोठे आव्हान भाजपासमोर होते. मात्र, शेकाप महाआघाडीची धुळधाण करत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. रायगडमधील सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदारांनी सपशेल नाकारत भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्याचे चित्र आहे. शिवसेनेने येथे मोठा जोर लावल्यानंतरही त्यांच्या पदरी निराशाच पडली.
पनवेल महापालिका : ७८जागा
बहुमाताचा आकडा: ४८
पक्ष जागा
भाजप- ५१
शेकाप- २३
काँग्रेस- ०२
राष्ट्रवादी- ०२
भिवंडीत सत्ता काँग्रेसकडे
भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसने पुन्हा एकदा काबीज केली आहे. ९० सदस्यसंख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस ४७ जागांसह बहुमतात आली. विशेष म्हणजे भाजपाने भिवंडी महापालिका खेचण्यासाठी विशेष जोर लावला होता. पण भाजपाला अवघ्या २० जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे शिवसेनेला १२ जागांवर यश मिळाले आहे. समाजवादी पक्ष दोन जागांवरच आटोपला तर १० अपक्ष निवडून आले.
भिवंडी महापालिका : 90 जागा
बहुमतासाठी 46
पक्ष जागा
काँग्रेस ४७
भाजप १९
शिवसेना १२
कोणार्क विकास आघाडी ०४
समाजवादी पक्ष ०२
आरपीआय ०४
राष्ट्रवादी काँग्रेस ००
अपक्ष ०२
मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादी?
मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटामध्ये छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने सर्वाधिक २८ जागा मिळवल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला २६ जागा मिळाल्या. शिवसेनेला १३ जागांवर यश मिळाले. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, मालेगावात भाजपाला ऐतिहासिक यश मिळाले आहे. एकही जागा नसलेल्या भाजपाने येथे नऊ जागांवर विजय मिळवला. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा गेली.
मालेगाव महापालिका : ८४ जागा
बहुमतासाठी : ४३
पक्ष जागा
काँग्रेस २८
राष्ट्रवादी (२०)+जनता दल (६) २६
शिवसेना १३
भाजप ०९
एमआयएम ०७
इतर ०१