मुंबई : भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल या तीन महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, येत्या 24 मे 2017 रोजी मतदान तर 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या तिन्ही महापालिकांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा प्रथमच बूथ निहाय मतदार यादी महिनाभर अगोदर म्हणजेच 24 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
त्यामुळे मतदारांना मतदान यादी नावे आहेत कि नाही हे पाहता येणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडी निजामपूर महापालिकेची मुदत 10 जून 2017 रोजी तर मालेगाव महापालिकेची मुदत 14 जून 2017 रोजी संपत आहे. पनवेल महापालिका ही 1 ऑक्टोबर रोजी अस्तित्वात आली आहे. एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी हि निवडणूक होत आहे. तिन्ही महापालिका क्षेत्रात एकूण 18 लाख 10 हजार 564 लोकसंख्या असून, 12 लाख 96 हजार 26 मतदार आहेत. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. या निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहे. भिवंडी निजामपूर महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 7 लाख रुपये तर मालेगाव आणि पनवेल महापालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 5 लाख रुपये आहेत. तसेच प्रत्येक बुथवर उमेदवारांच्या संपत्ती आणि गुहेगारी पार्शवभूमीच्या माहितीचा फलक लावण्यात येणार आहे. मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहेत असेही सहारिया यांनी सांगितले.