चेन्नई । तामीळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ई. के. पलानीसामी यांनी शपथ घेतल्यावर एक दिवसाच्या अंतराने लगेचच एआयएडीएमकेमध्ये राजकीय धुमश्चक्रीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात अंतरात्माच्या आवाज ऐकून माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या गटात सहभागी झालेले पार्टीचे अध्यक्ष ई. मधुसूदन यांनी शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर कारागृहात रवानगी केलेल्या वी. के. शशिकला यांचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व मधुसूदन यांनी रद्द केले आहे. याशिवाय शशिकला यांचे भाचे टीटीवी दिनकरन आणि एस.व्यंकटेश यांनाही पार्टीतील पदांवरून हटवण्यात आले आहे. दरम्यान, मधुसूदन यांना शशिकला यांना पक्षातून काढण्याचा कुठलाच अधिकार नसल्याचे पलानीसामी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणार्या के.ए. सेंगोट्टीयन यांनी सांगितले.
शशिकला यांची दोघा नातेवाईंकांची हकालपट्टी केल्यावर त्यांच्यासोबत कुठल्याही स्वरूपाचे संबंध ठेवू नका असा सल्ला मधुसूदन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. गेल्या आठवड्यात शशिकला यांनी मधुसूदन यांची पार्टीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली होती. त्यानंतर त्यांनी पार्टीचे वरिष्ठ नेते के.ए. सेंगोट्टियन यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली होती. मधुसूदन पार्टीच्या सिद्धांताविरुद्ध वागत असल्याचा आरोप शशिकला यांनी त्यावेळी केला होता.
कारागृहात सामान्य कैद्यासारखी शशिकलाला वागणूक
शशिकला आणि त्यांचे दोन नातेवाईक, एलावारसी आणि वी.के.सुधाकरन अधिक संपत्ती प्रकरणात शिक्षा भोगण्यासाठी दुसर्यांदा कारागृहात पोहोचले आहेत. याआधी 27 सप्टेंबर 2014 ते 18 ऑक्टोबरदरम्यान त्यांनी बंगळुरू कारागृहात दिवस काढले होते. शशिकला यांना महिलांसाठी असलेल्या बॅरेकमधील 10 फूट लांब आणि चार फूट रूंद असणार्या सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. रात्री झोपण्यासाठी शशिकला यांनी गादीची मागणी केली होती. पण ती अमान्य झाल्यामुळे पूर्ण रात्र त्यांना जमिनीवर झोपावे लागले होते. खराब प्रकृतीचे कारण देत शशिकला यांनी विविध सेवासुविधा देण्याची मागणी न्यायमूर्तींकडे केली होती. पण शशिकला यांना कुठल्याही स्वरूपाच्या विशेष सोयीसुविधा देण्यात येणार नसल्याचे कारागृहातील अधिकार्यांनी सांगितले.