पन्नीरसेल्वम यांची बाजू बळकट!

0

चेन्नई । तामिळनाडू राज्यात सत्ताधारी अन्ना द्रमुक पक्षातील सत्तासंघर्ष कमालीचा विकोपाला गेला असून, पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला व काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या गटांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शशिकला यांनी पक्षाच्या आमदारांना एका हॉटेलात ओलिस ठेवले असतानाच, पन्नीरसेल्वम यांच्या गटात मात्र मोठ्या प्रमाणात खासदारांची आवक सुरु झाली आहे.

पन्नीरसेल्वम यांचे मनोबल वाढले
रविवारी आणखी पाच खासदारांनी पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा देत, शशिकला यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकाविला. त्यामुळे पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा देणार्‍या खासदारांची संख्या आता दहा झाली आहे. दरम्यान, राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी सोमवारपर्यंत आपला निर्णय कळविला नाही तर ‘घोडेबाजार‘ वाढेल व त्याला प्रोत्साहन दिल्याचा खटला न्यायालयात दाखल करावा लागेल, असा इशारा भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. राज्यपालांनी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा संविधानाच्या कलम 32 अनुसार जनहित याचिका दाखल करावी लागेल, असेही स्वामी म्हणाले. आतापर्यंत एकूण दहा खासदारांनी व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकाविला आहे. द्रमुकचे लोकसभेत 37 व राज्यसभेत 13 खासदार आहेत.