खडकी (प्रतिनिधी) – स्मार्ट सिटीच्या नाविन्यपूर्ण योजनांना नागरिकांचा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांनी सजग राहून केंद्र सरकारच्या अशा योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आणि आपला परिसर स्मार्ट होण्यासाठी सायकलची योजना यशस्वी करावी, असे आवाहन खासदार शिरोळे यांनी केले.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सहकार्याने व झूमकार पेडलच्या साह्याने 100 सायकलींचा समावेश करून ही सेवा येथे सुरू करण्यात आली आहे. खडकी कॅटोन्मेंट परिसरात भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडच्या संरक्षण संपदा विभागाचे मुख्य संचालक एल.के. पेगू यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी खासदार शिरोळे बोलत होते. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. राजेंद्र जगताप, खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष अभय सावंत, सीईओ अमोल जगताप, खडकीतील विविध विभागांचे अधिकारी, रहिवासी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकांच्या गरजा माहित आहेत!
डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेतील क्षेत्र आधारित विकासकामे करताना शहराच्या इतर भागांनाही सोबत घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वी मी खडकी भागात काम केले असल्याने या परिसरातील नागरिक आणि त्यांच्या गरजा मला माहीत आहेत. त्यामुळे खडकी बोर्डाचा प्रस्ताव त्वरीत मान्य करत आम्ही येथे पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा सुरू केली.
नऊ ठिकाणी स्टेशन्स!
झूमकार पेडलचे व्यवस्थापक आगम गर्ग म्हणाले की, खडकी बाजार परिसरात एकूण नऊ ठिकाणी पेडल सायकल स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. यापैकी एका स्टेशनवरून सायकल घेऊन गेल्यानंतर आपली गरज संपल्यावर तेथून जवळ असणार्या दुसर्या सायकल पेडल स्टेशनलादेखील सायकल लावता येणार आहे.
सायकलींचे शहर पुन्हा!
रेंज हिल्स येथील केंद्रीय विद्यालय, सिम्बायोसिस, मिलिटरी हॉस्पिटल, खडकी बिझनेस सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, व कार्यालयाजवळील मुलींचे वसतिगृह, रेंजहिल्स येथील कॅन्टोन्मेंट मार्केट, जेसीओ क्वार्टर अशा या ठिकाणी सायकल स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा मिळवावी. आम्ही त्यास प्रोत्साहन देऊ असे एल.के. पेगू यांनी यावेळी सांगितले. कॅन्टोन्मेंट बोर्डला 200 वर्षे पूर्ण होताना ही नावीन्यपूर्ण योजना मिळत असल्याबद्दल खडकीचे सीईओ अमोल जगताप यांनी आनंद व्यक्त केला.
यापूर्वी, पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विद्यापीठात ही सायकल शेअरिंग सेवा सुरू केली होती. त्यानंतर औंधमध्येही 7 डिसेंबर रोजी ही सेवा सुरु करण्यात आली. विद्यापीठ परिसर आणि औंधमध्ये एकूण 175 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुसर्या टप्प्यात 12 जानेवारी रोजी ओफो कंपनीच्या सहकार्याने 275 सायकलींचा समावेश करून विद्यापीठ परिसरातील तरुण व इतर नागरिकांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला.