‘पब्लिक सायकल शेअरिंग सिस्टम’साठी पालिकेची खाससभा

0

पुणे । शहरातील वाहतुकीची समस्या आणि प्रदूषण यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा पुण्याला सायकलींची ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे पब्लिक सायकल शेअरिंग सिस्टम ही योजना प्रशासनाने तयार केली आहे. त्याला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या योजनेच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली असून मुख्यसभेच्या मंजुरीसाठी खास सभा 30 नोव्हेंबरला बोलवण्यात आली आहे.

शहरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. सुमारे 32 लाख चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा यामध्ये समावेश आहे. खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि शेअरींग सायकल योजना आणण्यात येत आहे.शहरामध्ये सध्या सायकल चालवणे अतिशय अडचणीचे आहे. यासाठी शहरामध्ये नागरिकांना सायकल चालवण्यासाठी पुन्हा प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. यासाठी शहरामध्ये चांगले सायकल ट्रॅक तयार करावे लागणार आहेत. सायकल आराखडा तयार करत असताना शहरातील सायकल चालविणार्‍यांना येणार्‍या अडचणी यांचा विचार आराखड्यात करण्यात आला आहे. रस्त्यांची पाहणी करून सायकल आराखडा तयार करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

100 नागरिकांमागे 1लाख सायकलींची आवश्यक
सायकल योजनेमुळे पुण्यात खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल. या योजनेअंतर्गत शहरामध्ये सायकल स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी नागरिकांना सायकली भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी शहरात स्वतंत्र सायकल ट्रॅक, रंगीत सायकल लेन आणि ग्रीन रस्ते केले जाणार आहेत. काही ठिकाणी मिक्स सायकल ट्रॅक केले जाणार आहेत. अनेक संस्था ही योजना चालवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे महापालिकेवर जास्त आर्थिक भुर्दंड पडणार नाही. 100 नागरिकांमागे 1 अशा एक लाख सायकली आवश्यक आहे. या धोरणाला मुख्यसभेची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर अंमलबजावणी सुरू होणार असल्याने या मंजुरीसाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.