भात शेतीसाठी तसेच येणार्या खरीपाच्या हंगामासाठी परतीचा पाऊस ठरतो उपयुक्त
जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केली मागणी
वडगाव मावळ : पावसाळ्यामध्ये वडगाव मावळ तालुका, खेड आणि धरण परिसरात मोठा पाऊस झाला. मावळातील सर्व धरणे भरून त्यातून विसर्गही करण्यात आला होता. मावळ परिसरात भात शेती मोठ्या प्रमाणात असते. या भात शेतीसाठी तसेच येणार्या खरीपाच्या हंगामासाठी परतीचा पाऊस उपयुक्त ठरत असतो. मात्र यंदा परतीच्या पावसामुळे शेतकर्यांची निराशा झाली. गरजेच्या वेळी पाऊस न झाल्याने मावळ तालुक्यातील भातउत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या अधिकार्यांनी पंचनामे व अर्ज भरून घेण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तालुक्यातील शेतकर्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केली.
विमा अधिकार्यांची बैठक
तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, सक्तीचा विमा रद्द करावा, पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर नेवाळे यांच्या पुढाकाराने येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात विमा कंपनीच्या अधिकार्यांची बैठक झाली. कृषी अधिकारी सुधाकर मोरे, इफको टोकियो विमा कंपनीचे मुख्य अधिकारी रमाकांत मांढरे, व्यवस्थापक सचिन तांबे आदींसह बँकेचे तालुक्यातील विभागीय अधिकारी, वसुली व विकास अधिकारी तसेच सर्व संस्थांचे सचिव उपस्थित होते.
नुकसानभरपाई देणे बंधनकारक
बाळासाहेब नेवाळे म्हणाले की, पीक कर्जाप्रमाणे शेतकर्यांकडून सरसकट विमाकपात केली जातो. शेतकर्यांना सरसकट विमा भरपाई मिळाली पाहिजे. कंपनीकडून हेक्टरी 42 हजार शंभर रुपये या प्रमाणे नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. तालुक्यातील क्षेत्र चार हजार 230 हेक्टर असून, विमा कंपनीने शंभर टक्के शेतकर्यांना नुकसान भरपाई दिल्यास तालुक्यातील तीन हजार 487 शेतकर्यांना 17 कोटी 80 लाख रुपये रकमेचा लाभ मिळू शकतो.