मावळात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; पुरेशा पावसाअभावी शेतकरी दुष्काळाच्या छायेत
पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादन 25 ते 30 टक्क्यापर्यंत घटले
वडगाव मावळ : यंदाच्या वर्षी पाऊस समाधानकारक झाला होता. भरपूर पावसामुळे मावळातील आंद्रा धरण, भुशी धरण, पवना धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र परतीच्या पावसाने घोर निराशा केली. आता पाणी साठा कमी होईल, यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या तसेच उपनगरांमध्ये पाणी कपात सुरू केली आहे. मावळ तालुक्यातील शेतक रीही मोठ्या संकटात आहेत. या मावळात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या परतीच्या पावसामुळे मोठा खोळंबा झाला आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादन 25 ते 30 टक्क्यापर्यंत घटले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. दुष्काळ जाहीर करावा, यासाठी सर्वच पक्षांनी मागणी केली आहे. मात्र अद्याप दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.
शेतकरी दुहेरी कात्रीत
हे देखील वाचा
भातपिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी मावळ तालुका हा अग्रेसर आहे. सुमारे 12 हजार हेक्टरवर भातपीक लागवडीचे क्षेत्र आहे. त्यामध्ये 70 ते 80 टक्के इंद्रायणी, 20 ते 25 टक्के फुले समृद्धी, आंबेमोहरचे प्रमाण खूपच कमी झाले असून, ते एक टक्क्यावर गेले आहे. या वर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे भातपीक जोमात येईल, या आशेने शेतकरी आनंदीत होते. परंतु परतीच्या पावसाने धोका दिल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. यावर्षी अधिक पाऊस झाल्याचे शासकीय यंत्रणेकडे नोंद असली तरी भातपिकासाठी जो नंतर पडणारा पाऊस आवश्यक होता. तो न पडल्याने पिकाला मोठा फटका बसला आहे. डोंगर पठारावरील भातपीक सुकून गेले आहे. तर काही भागात खडकाळ शेती आहे. त्या भागातही मोठा फटका बसला आहे. हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतकरी दरवर्षी काहीशा प्रमाणात तांदूळ विकून घरातील वर्षभराचा खर्च भागवतात मात्र यावर्षी भातपिकातच निम्म्याने घट झाल्याने विकले तर घरी खायचे काय आणि नाही विकले तर वर्षाचा खर्च कसा भागवायचा या दुहेरी कात्रीत सापडले आहेत.
पीक काढणीला सुरूवात
कार्ला परिसरात कार्ला, वेहेरगाव, भाजे, पाटणमध्ये भात काढणीला चांगला वेग आला आहे. भात झोडणीही उरकून घेण्याची मानसिकता अलीकडच्या काळात शेतकर्यांची दिसते आहे़. त्यात पावसानेही लवकर ओढ दिली आहे. भात काढून झाले की प्रत्येक शेतकरी शेतात क डधान्ये पेरीत असतो. पण त्याकरिता शेतात काहीशी ओल असण्याची आवश्यकता आहे. पावसाने लवकर ओढ दिल्याने शेतीची ओल वाढण्याची शक्यता कमी आहे़ लवकर भातकाढणी करून शेत लवकर पेरण्यासाठी शेतकर्यांची धावपळ चालू आहे. पण यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कडधान्ये पेरायला शेतात ओल येते की नाही, याबद्दल शेतकर्यांच्या मनात संभ्रम आहे आणि म्हणून लवकर भात काढणी क रण्याची लगबग सुरू दिसते.