परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारा भामटा गजाआड

0

कल्याण : एका नामांकित प्लेसमेंट कंपनीचे नाव वापरून परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घालणार्‍या एका भामट्याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद तारिक खान असे या भामट्याचे नाव असून, तो बिहारचा रहिवासी आहे. पोलिसांनी तारिककडून 26 पासपोर्ट, विविध कंपन्यांचे लेटरहेड, कागदपत्रे तसेच 1 लाख 29 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, तारिक कंपन्यांच्या नावाने पॉम्प्लेंट छापून ते वितरित करत गरजू लोकांची फसवणूक करायचा. त्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने एकावर एक असे सात शर्ट पॅन्ट अंगावर चढवले होते. इतकेच नव्हे तर 3 अंडरवेअर घातल्याचे दिसून आल्याने पोलीसही हैराण झाले. याबाबत त्याला विचारले असता त्याने थंडी ताप आल्याचे सांगितले असून, आपण पकडले जाऊ नये म्हणून त्याने हा पराक्रम केल्याचे पोलिसांना सांगितले.

काही दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रेरणा कन्सलटन्सी कंपनीचे मालक प्रकाश बोडके यांनी खान भाई नावाच्या इसमाने आपल्या कंपनीचा लोगो वापरत परदेशात नोकरीचे आमिष दाखवत पाच जणांना लाखोंचा गंडा घातल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी खान भाई नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. या आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता माहिती नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे आवाहन उभे ठाकले होते. या आरोपीला जेरबंद करण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, पोलीस उपायुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक विलास मोरे, सुरेश पाटील यांचे पथक नेमून शोध सुरू केला मोबाइल नंबर मिळाल्याने या नंबरच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर या खान भाईपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मोहम्मद तारिक खान असे या भामट्याचे नाव असून, तो बिहारमधील नवादा जिल्ह्यातील रहिवासी आहे .पोलिसांनी तारिककडून 26 पासपोर्ट, एसीसी, एल अँड टी, गॅमॉन इंडिया, अल अमामा ग्रुप्स सौदी आदी कंपन्यांची बनावट नियुक्तिपत्रं, ट्रॅव्हल्स कंपनीचे बनावट व्हिजिटिंग कार्ड जप्त केले आहेत. मोहम्मद हा नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना हेरून त्यांना परदेशात मोठ्या पैशाच्या नोकरीचे आमिष दाखवायचा. त्यासाठी किमान 5 हजारांपासून ते 25 हजारांपर्यंत पैसे उकळले जायचे. आतापर्यंत त्याने अशाप्रकारे 26 जणांना गंडा घातल्याचेही दिघावकर म्हणाले. त्याने कल्याण, नवी मुंबई, मुंबई परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना दुबई, सौदी, कुवेत येथे नोकरीचे आमिष दाखवत तसेच विझा काढून देण्याचे आमिष दाखवत अनेक जणांना लाखोंचा गंडा घातल्याचे उघड झाले असून, किती जणांची फसवणूक केली याचा तपास सुरू आहे.