परदेशात स्वच्छतेचे जे नियम पाळतो तेच भारतातही पाळावेत

0

‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषद व मनपाची आढावा बैठक

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

धुळे । परदेशात गेल्यावर तेथील स्वच्छतेसह सर्वच नियम आपण काटेकोरपणे पाळतो. ते पाळले नाहीत, तर शिक्षा होण्याची भीती असते. त्यामुळे परदेशात स्वच्छतेचे नियम आपण पाळतो. तेच नियम येथेही पाळत स्वच्छता राखावी. स्वच्छता मोहीम अभियान म्हणून राबवावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. पालकमंत्री श्री. भुसे आज धुळे दौर्‍यावर होते. त्यांच्या उपस्थितीत शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या महत्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषद धुळे व महानगरपालिका धुळे यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

सर्वांनी स्वच्छतेची घेतली शपथ
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, महापौर कल्पना महाले, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. तसेच स्वच्छता अभियानानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व कर्मचार्‍यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

स्वच्छेतेचे केले आवाहन
अस्वच्छतेला आव्हान म्हणून स्वीकारत स्वच्छतेसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. तसेच शौचालय केवळ बांधून उपयोगाचे नाही, तर त्याचा वापरही केला पाहिजे. त्यामुळे स्वच्छतेचे आव्हान प्रत्येकाने स्वीकारावे. या अभियानास ग्रामसेवकांनी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे तर धुळे जिल्हा ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे असल्याचे जिल्हा परीषदेच्या सीईओ यांनी सांगितले.