परदेशी पाहुण्यांनी लुटला गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद

0

कॅनडा-नेदरलँडच्या नागरिकांनी घेतले गणेशमूर्ती घडविण्याचे धडे व गणपतीस्रोत

पुणे । महाराष्ट्रातील गणेशोत्सव केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगातही प्रसिद्ध आहे. हा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशविदेशातील नागरिक पुणे शहरात येत असतात. असाच काहीसा प्रसंग पुण्यातील सारसबागेत पहायला मिळाला. महापालिकेच्या वतीने आयोजित उपक्रमात तयार केलेल्या गणेशमूर्ती घरी घेऊन निघालेली शाळकरी मुले सारसबागेत गेली असता त्या ठिकाणी असलेल्या कॅनडा आणि नेदरलँड येथील परदेशी नागरिकांनी त्या मुलांकडून गणेशमूर्ती घडविण्याचे धडेही गिरवले आणि गणपतीस्रोत देखील म्हटले.

गणेशोत्सवाबद्दल अभ्यास करता येईल
कॅनडाहून आलेला पॉल म्हणाला, मी गणेशमूर्ती घेऊन जाणार्‍या मुलांना पहिले तेव्हा मला अतिशय आनंद झाला. या लहान मुलांच्या हातात किती कौशल्य आहे, ही लहान मुले गणेशाच्या मूर्तींना किती चांगल्या प्रकारे आकार देतात. ही लहान मुले म्हणत असलेल्या प्रार्थनेमुळे मला आनंद झाला आहे. पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट देण्याची संधी मला मिळाल्याचे त्यांनी बोलून दाखविले. आम्हाला एक वर्ष भारतात राहायचे आहे आणि त्यामुळे गणेशोत्सवाबद्दल आम्हाला अधिक अभ्यास करता येईल. ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत ते मुलांमध्ये रममाण झाले.

गणपती बाप्पाला भेटू !
भारतात योग आणि ध्यान शिकण्यासाठी ते आले असून गेल्या महिनाभरापासून लोणावळा येथे वास्तव्यास आहेत. गणेशोत्सवाबद्दल आम्ही नेहमी ऐकले होते आणि टीव्हीवर गणेशोत्सवाची झलक पाहिली होती. पण यावर्षी आम्ही भारतात आलोच आहोत तर गणपती बाप्पाला भेटू असा विचार आम्ही केला, असे एका युवतीने सांगितले.