मुंबई: देशात दिवसेंदिवस कोरोन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दिवसासाठी ‘जनता कर्फ्यू’ ची घोषणा करण्यात आली होती. संध्याकाळी टाळी आणि थाळीनादाच्या नावाखाली गर्दी करणाऱ्यांवर शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामना वृत्तपत्रातून जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांनी लोकांना घराच्या बाल्कनीत येऊन थाळीनाद करण्यास सांगितले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. लोकांच्या झुंडी नाचत, उड्या मारीत रस्त्यावर उतरल्या व या सगळ्या प्रकारास एक प्रकारे उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. तसेच दिल्ली विमान तळावर परदेशाच्या विमानांना परवानगी देण्यात आली आहे. यावर शिवसेनेने टीका करत परदेशी विमानांतून दिल्लीत सरकारचे जावई येणार आहेत काय?, असा प्रश्न विचारला आहे.
दिल्लीच्या सीमा सील करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली विमानतळ बंद असेल असे त्यांनी जाहीर केले. केजरीवाल योग्य तेच करीत होते, पण लगेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले, विमानतळे चालूच राहतील. परदेशातून विमानांचे लँडिंग होईल. त्यामुळे पुन्हा गांभीर्याचे बारा वाजले. परदेशी विमानांतून दिल्लीत सरकारचे जावई येणार आहेत काय?, असा सवाल करतानाच राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय राहिला नाही तर कोरोनाचे तांडव वाढतच जाईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
‘एम्स’ या भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थेच्या डॉक्टर्स मंडळींनी त्यांच्या संचालकांना एक पत्र लिहिले व उत्सवी मंडळीचा मास्क उतरवला आहे. कोरोनाचा सामना करायला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत, असे एम्स चे डॉक्टर्स सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या संस्थांकडे शस्त्रे नाहीत, आयुधे नाहीत व ते निःशस्त्र लढत आहेत असे समजायचे काय? कोरोनाविरोधात युद्ध आहे. युद्धात डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेवक बिनहत्यार लढत असतील तर कसे होणार? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.