मुंबई – शेतकरी डचणीत असताना परदेश वाऱ्यांमध्ये रमलेले राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना तातडीने परत बोलवावे, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. शिवसेनेनेही मंत्र्यांच्या या दौऱ्याला विरोध केला असून हे असंवेदनशीलतेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रकूल संसदीय मंडळाच्या दौऱ्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून पांडुरंग फुंडकर तसेच गिरीश बापट सध्या ऑस्ट्रेलिया व सिंगापूरच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांना तातडीने परत बोलवा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. चव्हाण यांनी काल पंतप्रधानांना पाठविलेले शुक्रवारी प्रसिद्धीमाध्यमांना उपलब्ध करून दिले. यात ते म्हणतात- तुम्ही शेतकऱ्यांना गतवर्षी आवाहन केले होते की तुरीचे उत्पादन वाढवा. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी तुरीचे विक्रमी पिक घेतले आहे. मात्र किमान हमी भावात तुरीची खरेदी होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मराठवाडा व विदर्भातील शेतकरी, तूर सरकारने हमी भावात घ्यावी याची वाट पाहत आहेत. शतेकरी अडचणीत असातना तूर खरेदीशी थेट संबंध असणारे महाराष्ट्राचे दोन मंत्री म्हणजे कृषी मंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री परदेशात गेले आहेत हे योग्य नाही. शेतकऱ्यांची समस्या उग्र बनलेली असताना हे दोघे चक्क १३ दिवसांच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड तसेच सिंगापूरला गेलेच कसे, असा सवाल आहे. या दौऱ्याची वेळ वाईट असून त्यामुळे जनतेला तीव्र धक्का बसलेला आहे. तुम्हाला हे माहितच आहे की कोणत्याही मंत्र्यांना परदेशात प्रवास करण्याआधी मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. सबब तुम्ही लगेचच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगून या दोघा मंत्र्यांना तातडीने कर्तव्यावर हजर व्हायला सांगा. सभापती तसेच अध्यक्षांच्या नेतृत्त्वाखालील संसदीय मंडळाचा दौरा मात्र पुढे चालू ठेवायला हरकत नाही. या मंत्र्यांना माघारी बोलावून शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय करायला सांगावे.
हे असंवेदनशीलतेचे लक्षण
पृथ्वीराज चव्हाण यांचे पत्र एकीकडे असतानाच शेतकरी संकटात असताना मंत्री दौऱ्यावर जातातच कसे अशा शब्दात शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांनी संताप व्यक्त केला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना आज आधाराची गरज आहे. ही वेळ परदेश दौऱ्याची नाही. शेतकरी संकटात असताना मंत्र्यांनी दौऱ्यावर जाणे हे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वी आमच्या मंत्र्यांचे दौरे रद्द केले होते. भाजपा मंत्र्यांवर अशी टीका करतानाच कदम यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले. कर्जमाफीसाठी विरोधकांची संघर्षयात्रा म्हणजे नौटंकी आहे. शेतकऱ्यांसाठी संघर्षयात्रा काढण्याचा अधिकार विरोधकांना नाही. त्यांनीच राज्याला आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले आहे. कर्जमाफी मागणारे विरोधी पक्षांचे आमदारही या परदेश दौऱ्यात सहभागी झाले आहेत, असेही ते म्हमाले. मात्र, शिवसेनेचेही आमदार या दौऱ्यात गेले आहेत याविषयी त्यांनी मौन पाळले.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे दोऱ्याला समर्थन
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्र्यांच्या या परदेश दौऱ्याचे समर्थन केले आहे. हे दौरे बरेच आधी उभय राष्ट्रांशी चर्चा होऊन ठरलेले असतात. त्यांचे एक निराळे महत्त्व असते. कृषीमंत्री वा अन्य मंत्र्यांची उत्तरे विधिमंडळात न ऐकणारे विरोधी नेते आता मात्र त्यांच्या परत येण्याचा आग्रह धरतात ही एक गंमतच आहे. शिवाय मुख्यमंत्री इथे आहेत. शेतकऱ्यांबाबतीत आवश्यक ते सर्व उपाय केले जात आहेत असेही ते म्हणाले.
सामंज्यस करार
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स संसद व महाराष्ट्राचे विधानमंडळ यांच्यात काल सामंजस्य करारावर सह्या झाल्या. सिडनी येथे एका शानदार समारंभात सहकार्य व सामंजस्याचा करार झाला. न्यू साऊथ वेल्स संसद व महाराष्ट्राचे विधिमंडळ हे दोन्ही राष्ट्रकुल संसदीय मंडळ या जागतिक संघटनेचे सदस्य आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकार व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्त्वाखाली हे शिष्टमंडळ सध्या ऑस्ट्रेलियात दाखल जाले आहे. त्यांचा दौरा ऑस्ट्रेलिया सह न्यूझीलंड व सिंगापूर येथे होत असून तो 15 मेपर्यंत चालणार आहे. या दौऱ्यात बापट व फुंडकर यांच्यासह शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे शरद रणपिसे, उपसभापती माणिकराव ठाकरे व संजय दत्त, राष्ट्रवादी काँग३सचे राहूल नार्वेकर, प्रधान सचिव अनंत कळसे सहभागी झाले आहेत.