मुंबई :- शासनाच्या मार्गात एसआरएच्या माध्यमातून परप्रातियांना घरे मिळतात मात्र मुंबईला उभं करणाऱ्या गिरणी कामगारांना मात्र हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी केला. गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळायलाच हवी अशी मागणी गिरणी कामगारांनी विधानभवनावर काढलेल्या मोर्चाबाबत औचित्याचा मुद्दा मांडताना अजित पवारांनी विधानसभेत केली.
घरांसाठी गिरणी कामगारांचे नवीन २० हजार अर्ज, तसेच पुर्वीचे दीड लाख अर्ज प्रलंबित आहेत. अनेक आंदोलने केल्यानंतर गेल्या दहा वर्षात केवळ ११ हजार कामगार व मृत कामगारांच्या वारसांना घरे मिळालेली आहेत. परंतु अद्याप दीड ते दोन लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. सध्या सरकारकडे सहा हजार सातशे घरे तयार आहेत, परंतु अद्याप या घरांचे वाटप झालेले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी 2 डिसेंबर 2016 रोजी गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढताना उर्वरित घरांची सोडत लवकरच काढण्यांचे आश्वासन या गिरणी कामगारांना दिले होते परंतु अजूनही त्याबद्दल कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही, असेही पवार यांनी सांगितले. त्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर काढली जावी अशी मागणीही पवार यांनी केली.