श्री क्षेत्र मेहुण येथे श्री संत सोपान काका समाधी सोहळा
मुक्ताईनगर- सुख आणि आनंद ज्या परमात्म्याच्या सानिध्यात प्राप्त होतो अशा परमात्म्याची संगती धरल्यास भ्रांतीचा समूळ नाश होऊन निश्चिंती होते. अशा परमात्म्याचे चिंतन करून त्याच्या चरीत्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनात केला जातो. त्यामुळे सुख आणि आनंद देणारे काल्याचे कीर्तन पुण्यात्मक पगाराचे किर्तन असते, असे प्रतिपादन जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हभप चैतन्य महाराज देहूकर यांनी श्री क्षेत्र मेहूण तापीतीर येथे केले. मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र मेहुण तापीतीर येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान येथे सलग चौथ्या वर्षी श्रीसंत मुक्ताई वारकरी सेवा समितीतर्फे श्री संत सोपान काका समाधी सोहळा पार पडला. 27 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान हा सोहळा पार पडला. समारोपात चैतन्य महाराज देहूकर यांनी ‘तुझिये संगती झाली आमची निश्चिंती’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित काल्याचे कीर्तन केले.
देवाच्या संगतीत सुखच -चैतन्य महाराज
चैतनय महाराज म्हणाले की, काही गोष्टी प्राप्त असतात पण त्याचा भोग घेता येत नाही. देवाच्या संगतीत सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला जे सुख प्राप्त होते ते असार आणि मर्यादित असते. परंतु खरे सुख हे परमात्म्याच्या संगतीत असून ते सार आणि अमर्यादित असते. जे कधी पाहिले नाही अशा सुखाचे सोहळे परमात्म्याच्या संगतीत बघायला मिळतात. श्रीकृष्णाने गाई राखता-राखता आणि रांगता रांगता ज्या लीला केल्या, त्याचा उच्चार काल्याच्या कीर्तनात केला जात असल्याचेही चैतन्य महाराज देहूकर यांनी सांगितले. श्री संत सोपानकाका समाधी सोहळ्यात निरंजन भाईजी महाराज शिंदे यांनी शिवपुराण कथा सांगितली. संपूर्ण आठवडाभर सकाळी आठ ते दहा वाजेदरम्यान पार पडलेल्या महारूद्र यागात 100 जोडप्यांनी सहभाग नोंदवून पूजा केली. पौरोहित्य शारंगधर महाराज व अतुल महाराज यावलकर यांनी केले. सप्ताहात दररोज सकाळी व रात्री हरी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज हभप संजय महाराज देहूकर यांची विशेष उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी श्रीसंत मुक्ताई वारकरी सेवा समितीतर्फे शारंगधर महाराज मेहूणकर यांच्यासह सर्व कीर्तनकार मंडळी व मुक्ताई भाविकांनी परीश्रम घेतले.