फैजपूर । मनुष्याने केवळ मुर्तीपूजा करुन परमात्मा प्रसन्न होत नाही, तर आपण त्यांनी सांगितलेले उपदेश, आचरण, गुणानुसार अनुकरण करणे म्हणजेच परमात्म्याला प्रसन्न करणे होय. श्री हनुमंत हे विद्यावान, गुणी, चतुर, बलशाली अशा विविध गुणांनी संपन्न होते. ते त्यांच्या रुपामुळे नाही तर गुणांमुळे त्यांची आपण आराधना करतो असे मौलिक विचार महामंडलेश्वर आचार्य जर्नादन हरिजी महाराजांनी प्रवचनाचे निरुपण करताना सांगितले. येथील हनुमान मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
शिव पिंडीची स्थापना
येथील जानकीनगरमध्ये पंचमुखी हनुमान व भवानी शंकर यांच्या पिंडी व नंदीची प्राणप्रतिष्ठा गेल्या तीन दिवसांपासून ब्राह्मण वेदोपचार मंत्र व होमहवन करुन मोठ्या आनंदाने असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आली.
संत- महंतांची होती उपस्थिती
यावेळी कुसुंबा श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती आखाडा प्रमुख महंत भरतदास महाराज, स्वामीनारायण संस्थानचे गादीपती आखाडा प्रमुख महंत भरतदास महाराज, स्वामीनारायण संस्थानचे शास्त्री भक्तीकिशोरदास महाराज, डोंगरदा दत्तधाम मंदिराचे संत स्वरुपानंद, महाराज, पद्लोचनदास महाराज यांसह शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
धार्मिक कार्यक्रम
मुर्तीची विधिवत अभिषेक करुन स्थापना करण्यात आली. स्व. मुरलीधर यमाजी चौधरी यांच्या संकल्पनेतून 1986 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीस श्रीगणेश मंदिर बांधण्यात आले. आणि आज पंचमुखी हनुमंत व भवानी शंकराची सुंदर विलोभनीय मुर्तीची स्थापना झाली. तीन दिवस भजन, किर्तन व प्रवचनांचे भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले. शेवटच्या दिवशी जनार्दन महाराज यांचे प्रवचन पार पडले.