नवी मुंबई । मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. बाजारात परराज्यांतील भाज्या येत असल्यामुळे सध्या भाज्यांचे दर नियंत्रणात आले आहेत, तर काही भाज्यांचे उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्याने दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वधारलेले आहेत. सध्या घाउक बाजारात टोमॅटो 40 रुपये किलो, तर किरकोळ बाजारात 50 रुपये किलोने विकला जात आहे. थंडी सुरू झाली असून वेलीवर येणार्या भाजीपाल्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे घेवडा, तोंडली, दुधी भोपळा, फरसबी सारख्या भाज्यांचे प्रमाण कमी होते. परिणामी, दरात वाढ होते. त्यानुसार सध्या गवार 40 ते 50 रुपये किलो, घेवडा 40 रुपये, तोंडली 30 ते 35 रुपये किला, भोपळा 20 ते 25 रुपये किलोदराने विकला जात आहे.
बाजारात परराज्यातील भाज्या आल्याने अनेक भाज्यांचे दर खाली आले आहेत. यात प्रामुख्याने फ्लॉवर 8 ते 10 रुपये किलो, तर वांगी 15 ते 18 रुपये, कोबी 10 ते 15 रुपये, लाल भोपळा 8 ते 12 रुपये, किलो आहे. सुरण 14 ते 18 रुपये किलो आहे. आतापर्यंत 50 ते 60 रुपये किलो असलेला हिरवा वाटाणा 25 ते 35 रुपये किलो झाला आहे. परतीच्या पावसापाठोपाठ अवकाळी पावसाचा फटका बसल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे दर वाढले असल्याचे भाजीपाला विक्रेते सांगत आहेत. मात्र, आता परराज्यांतून समाधानकारक मालाची आवक होत असल्याने भाजीपाल्याचे दर नियंत्रणात आले आहेत. ठरावीक भाज्यांचे दर वाढलेले आहेत. मात्र, सध्या बाजार सावरायला सुरुवात झाल्याचे भाजीपाला व्यापारी सांगत आहेत.
घाउक बाजारात शेवग्याच्या शेंगा 80 ते 90 रुपये किलो आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांसाठी 120 रुपये मोजावे लागत आहेत. तर काही भाज्यांचे दर हे परराज्यातील भाज्यांमुळे कमी झाले आहेत. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
– संदीप चौधरी,
भाजी विक्रेता