परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुढल्या राष्ट्रपती होणार

0

नवी दिल्ली : येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांची मुदत संपत असून, त्यापुर्वीच नव्या राष्ट्रपतींची निवड आवश्यक आहे. त्याचे वेध येत्या महिन्यात लागणार असून, मुखर्जी यांनाच मुदतवाढ मिळते की पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणा नव्या व्यक्तीला राष्ट्रपती भवनात विराजमान करू बघतात, ते समजू शकेल. ताज्या विधानसभा निकालांनी भाजपाचे राष्ट्रपती निवडणूकीतील वजन वाढलेले आहे. म्हणूनच आपल्या निवडीचा राष्ट्रपती करण्याचे धाडस मोदी करू शकतील. १९९७ सालात वाजपेयी यांच्या पाठीशी इतके संख्याबळ नसल्याने त्यांना तडजोडीचा पक्षबाह्य उमेदवार म्हणून डॉ. अब्दुल कलाम यांना निवडावे लागले होते. त्यापेक्षा आज मोदी प्रबळ पंतप्रधान ठरलेले आहेत.

राष्ट्रपतीच्या निवडणूकीत खासदार व विधानसभेचे आमदार मतदान करू शकतात. त्यात खासदार व आमदारांचे मतमूल्य समान विभागलेले असते. त्यामुळेच राज्याचे जितके खासदार तितकेच मतमूल्य आमदारात विभागले जाते. सहाजिकच उत्तरप्रदेशच्या आमदारांचे मतमूल्य अधिक असून, त्यामुळेच मोदींना आपल्या पसंतीची व्यक्ती राष्ट्रपती भवनात बसवणे शक्य होणार आहे. अजूनही भाजपाकडे पुर्ण बहूमत नसले, तरी सर्वाधिक मते झालेली आहेत. त्यात एखाद्या प्रबळ प्रादेशिक पक्षाचा पाठींबा मिळाला, तरी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती भाजपाच्या पसंतीचे होऊ शकतील.

सुषमा स्वराज यांची प्रकृती धडधाकट नाही, पण त्या एका जागी बसून उत्तम काम करू शकतात. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी मागल्या तीन वर्षात उत्तम कामगिरी पार पाडलेली आहे. शिवाय त्या निमीत्ताने त्यांना जागतिक राजकारणाचा अनुभवही मिळालेला आहे. सहाजिकच त्यांनाच देशाच्या सर्वोच्चपदी बसवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा स्थितीत मंत्रीमंडळात फ़ारमोठे फ़ेरबदल येत्या महिन्याभरात होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पियुष गोयल यांना अर्थं किंवा संरक्षण खात्यात बढती मिळण्याचीही शक्यता आहे.