परळी कृषि उत्पन्न बाजार समितीत प्रतिष्ठा पणाला

0

मुंबई – राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहिण-भावाच्या प्रतिष्ठेची असलेली परळी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी ९६.५४ टक्के मतदान झाले. सोमवारी याची मतमोजणी होणार असून त्यात या दोघा बहिण-भावाचे स्थानिक वर्चस्वाचे भवितव्य निश्चित होणार आहे.

परळी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी सकाळी आठ ते संध्याकाळी चार, या वेळेत मतदान झाले. एकूण १९१३ मतदारांपैकी १८४७ मतदारांनी मतदान केले. येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे गोपीनाथराव मुंडे शेतकरी विकास पॅनेल आणि धनंजय मुंडे यांचे पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनेल, अशा दोन पॅनेलमधून निवडणूक लढविली जात आहे. या दोन पॅनेलमधून ३६ तर इतर अपक्ष, असे एकूण ४७ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी धनंजय मुंडे येथे रविवारी ठाण मांडून होते. पंकजा मुंडे परदेशात असल्यामुळे त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे परळी मुक्कामी आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.