पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत (पीएमआरडीए) विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. हा विकास आराखडा तयार करताना सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी आरक्षण ठेवावे, असा प्रस्ताव म्हाडाने प्राधिकरणाला दिला आहे. यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.
केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे ही योजना आखली आहे. त्यातंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत 3 लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. प्राधिकरणाच्या हद्दीत किती कुटुंबांना हक्काची घरे हवी आहेत, यांची माहिती घेण्यासाठी म्हाडाने नागरिकांकडून मध्यंतरी अर्ज मागविले होते. त्यानुसार म्हाडाकडे तब्बल 54 हजार अर्ज दाखल झाले होते. त्यांची छाननी पूर्ण झाली आहे.
…तरच घरांची निर्मिती
प्राधिकरणाच्या हद्दीतील अर्जांची दखल घेऊन त्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन म्हाडाकडून करण्यात आले आहे. पीएमआरडीएकडून हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. आराखडा तयार करताना त्यामध्ये परवडणार्या घरांसाठीचे आरक्षण ठेवावे, असा प्रस्ताव म्हाडाने पीएमआरडीएकडे दिला आहे. आराखड्यात जागांचे आरक्षण ठेवले, तरच परवडणार्या घरांची निर्मिती करणे म्हाडाला शक्य होणार आहे.