नंदुरबार। नगरपालिकेच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या बहुचर्चित व्यापार संकुलाचे अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी पालिकेच्या पथकाने गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील हातोडा मारण्याची कारवाई केली. मात्र निवासी बांधकामाची परवानगी घेत त्या जागेवर मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे, त्याचे काय असा सवाल आता नंदुरबारकर नागरिक उपस्थित करू लागला आहे.
नगरपालिकेच्या शेजारी सर्व्हे नंबर ४५१ अ/१ च्या जागेवर काही व्यापार्यांनी दि.२५ जुलै २०१७ रोजी निवासासाठी बांधकामाची परवानगी घेतली. परंतू ती परवानगी प्लींथ लेवलपर्यंत निवासी बांधकामासाठी देण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणी मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. याबाबत सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने दि. २१ सप्टेंबर २०१९ रोजी मुख्याधिकार्यांकडे तक्रार करुन बांधकाम अनधिकृत असून निवासी प्रयोजनासाठी असतांनाही त्यावर व्यापारी संकुल उभारण्यात आल्यामुळे अवैध बांधकाम पाडण्यात यावी, अशी मागणी केली. या तक्रारीनंतर पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी संबंधीत व्यापार्यांना नोटीसा देवून अवैध बांधकाम ३० दिवसाच्या आत काढून टाकावे, अन्यथा पालिकेमार्फत काढल्यास त्याचा खर्चही वसुल करण्यात येईल, असे आदेश दिले होते. मात्र, तरीही संबंधीत व्यापार्यांनी निवासाची परवानगी दाखवून १९४.८० चौरस मीटर एवढया जागेवर बांधकाम पूर्ण केले असून मुख्याधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.याशिवाय बांधकाम हे निवासी बांधकामाच्या परवानगीपेक्षा जादा बांधण्यात आले आहे. मुख्याधिकार्यांच्या नोटीसीला दीड वर्ष झाले तरीही बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधीत व्यापारी हे नगरपालिकेलाही जुमानत नसल्याचा आरोप सर्वत्र होऊ लागल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी व्यापार संकुलाच्या ओट्याचे बांधकाम काढले. तथापि गुरुवारी दुसऱ्या दिवशी देखील व्यापारी संकुलाच्या पाठीमागे असलेल्या सुमारे पाचशे स्वेरफुट अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली,त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले, असे असले तरी निवासी बांधकामाच्या नावाखाली जे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे,त्याचे काय असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत, याच जागेवर एखाद्या गरीब माणसाचे बांधकाम राहिले असते तर नगरपालिकेने ते जमीनदोस्त केले असते,मग एवढ्या मोठया अनधिकृत व्यापारी संकुलाला संरक्षण देण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.