परवाना नसतांना काली पिलीमधून प्रवाशांची वाहतूक

0

खाजगी वाहतुकीत प्रवाशांचा जीव टांगणीला

चाळीसगाव । चाळीसगाव शहर व तालुकाभरात परवाना नसतांना खाजगी वाहने व काही कालीपिली वाहने प्रवासी वाहतूक करीत असून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरुन त्यांची वाहतूक होत असल्याने प्रवाशांच्या जीवाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही अवैध व बिनबोभाट सुरु असलेली वाहतूक बंद करावी व प्रवाशांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी काही प्रवासी करतांना दिसत आहे. चाळीसगाव तालुका हा जिल्ह्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. जवळपास चाळीसगाव शहरातून तीस-पस्तीस किलोमीटर अंतक कापावे लागते. त्यासाठी वेळेवर परिवहन मंडळाच्या बसेस नसल्याने प्रवासी खाजगी वाहनांचा वापर करतात.

गुरांप्रमाणे कोंबतात प्रवाशांना
अनेक वाहने भडगाव रोड, हिरापूर रोड, घाट रोड, धुळे रोड, नागद रोड, बस स्टॅन्डजवळ, कॅप्टन कॉर्नरजवळ बेधडक उभी राहतात व या वाहनांमधून गुरे कोंबावीत अशा पद्धतीने प्रवासी भरुन जीवाची पर्वा न करता वाहतूक केली जाते. यात खाजगी वाहने व काही वाहनांना काळा पिवळा रंग मारुन त्याची वाहतूक केली जाते. मात्र यामुळे अनेकदा छोटे व मोठेसुद्धा अपघात झाले आहेत. मात्र त्याची पर्वा न करता हे वाहनचालक दोन पैशांच्या आशेने आपली वाहने चालवित असतात. याकडे शहर वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे. फक्त वाहनकचालकांना कागदपत्रे तपासून त्रास दिला जातो. मग ही वाहने ज्या पद्धतीने चालतात याला आशिर्वाद कुणाचा? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. तालुकाभरा त शेकडो वाहने प्रवाशांना घेऊन ये-जा करतात. अशा किती वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली याची तपासणी देखील पोलिस अधिक्षकांनी करावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे.