परवाना नूतनीकरण 1 जानेवारीपासून

0

पुणे : महापालिकेने दिलेल्या ज्या परवान्याची मुदत 31 मार्च 2019 ला संपत आहे, त्यांचे 1 जानेवारीपासून 2019 पासून नूतनीकरण अर्ज स्विकारण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. मंगल कार्यालय, सलून, ब्युटीपार्लर, लॉजिंग, कातडी कमावणे, कातडी-हाडांचा साठा, रसगुर्‍हाळ, अंडीविक्री, पानपट्टी, धान्यभट्टी, आईस फॅक्टरी, नर्सिंग होम रजिस्ट्रेशन आदी परवाना धारण करणार्‍या व्यावसायिकांसाठी हे आवाहन करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरण अर्ज आपल्या भागातील क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये किंवा महापालिका भवनात असलेल्या नागरी सुविधा केंद्रांत सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत द्यावा, असेही यामध्ये नमूद केले आहे.

विलंब शुल्क आकारणार

महापालिकेचा छापील फॉर्म भरून परवाना शुल्क भरून परवाने नूतनीकरण करून घेता येणार आहेत. दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी तसेच सार्वजनिक सुट्ट्या वगळता हे कामकाज सुरू राहणार आहे. अर्जांसोबत मूळ परवाना पुस्तक, रजिस्ट्रेशनची छायांकित प्रत, व्यवसायानुसार दिलेली आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जांमध्ये माहिती अचूक भरावी लागणार असून, अर्धवट माहिती भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. 31 मार्च 2019 नंतर नूतनीकरण फी भरल्यास विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. धनादेशाद्वारे शुल्क भरायचे असल्यास 25 मार्चपूर्वी ते महापालिका कार्यालयात जमा करणे आवश्यक असल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.