जळगाव। प्रचंड गाजलेल्या सिमी खटल्यात संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यावर 2001 मध्ये एमआयडीसी पोलिसात 10 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने अटकेतील आरोपीपैकी 4 जणांना निर्दोष मुक्त करीत 6 जणांना शिक्षा सुनावली होती. नंतर पुन्हा तपास केल्यावर दोघांवर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी परवेजखान रियाजखान व मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अटकेतील आसिफखान बशीरखान या दोघांना जळगाव न्यायालयाने कट रचल्याच्या आरोपात दोषी ठरविले त्यांना न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षांची सक्तमजुरी व 10 दहा हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली .दंड न भरल्यास तीन महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
हरकत फेटाळली
आरोपी आसिफखान येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये होता. न्यायालयाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून ऐकत होता.परवेज खानंचे वकील सुनिल चौधरी यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, कट सिध्द झाला नाही तर कट रचल्याची शिक्षा कशी होऊ शकते. त्यानंतर न्या. पटणी यांनी स्पष्ट केले की आरोपींना 121,121 अ,122,123, 153 अ या कलमातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. मात्र 120 (ब) प्रमाणे त्यांना सक्तमंजुरी व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 3 महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल.
तुरुंगातील कालावधी शिक्षेत समाविष्ट
न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यावर परवेज खानंला पोलिसांनी न्यायालयात हजर केले.नंतर व्हीडीओ कॉन्फरन्सिंग सुरू झाली. आरोपींच्या शिक्षेवरील युक्तीवाद संपल्यानंतर दुपारी 1.05 मिनिटांनी शिक्षा सुनावण्यात आली. न्या. ए.के.पटणी यांनी आरोपींना विचारले की निकालाची प्रत तुमच्या वकीलाकडे दिली तर चालेल का? यावर आरोपीनी होकार दिला. परवेज खानसह येवरडा जेलमध्ये असलेला आरोपी आसिफ खानला दिलेल्या शिक्षेत ते तुरूंगात असल्याने तुरुंगात असल्यापासून आतापर्यंत शिक्षेचा कालावधी ग्राह्य धरला जाईल. न्यायालयात शिक्षेची सुनावणी सुरू असतांना परवेज खानची पत्नी उपस्थित होती.
शिक्षेवर आक्षेप
हा निर्णय आम्हाला चुकीचा वाटतो आहे. 10 दोषी सुटले तरी चालतील मात्र एका निर्दोष माणसाला शिक्षा व्हायला नको या तत्वानुसार तो मान्य नाही आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत.या गुन्ह्यातील सर्व आरोपीना निर्र्दोेष मुक्त केले आहे. गुन्ह्याचा कट रचल्याचे 120 (ब) कलम असले तरी स्फोटके बाळगणे, देशद्रोहाचो गुन्हा सिध्द झाला नाही, मग शिक्षा कशी ? असा प्रश्न परवेज खानचे वकील अॅड.सुनील चौधरी यांनी उपस्थित केला. आसिफ खानचे वकील ए.आर.शेख म्हणाले की, सक्षम न्यायालयाने दिलेला निकाल आहे. तथापि आमच्या हरकतींची दखल घेतली जावी म्हणून आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. तो आरोपीचा अधिकार आहे. निकाल हातात आल्यानंतर विचार करून पुढचा निर्णय घेऊ असे सरकारी वकील अॅड.केतन ढाके यांनी सांगितले. आरोपी अपिलात गेले तरी त्यांना अंतिमनिर्णय होईपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार आहे. विघातक कारवायांचा आरोप असल्याने त्यांना सहज जामीन अशक्य आहे.
जळगावाने देशाचे लक्ष वेधले
जळगावात सीमीचे कार्यकर्ते सक्रीय असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात स्पष्ट झाल्यानंतर हा मुद्दा थेट लोकसभेत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने सीमी ही संघटना विघातक कारवाया व कटांमध्ये सहभागी असल्याचा निष्कर्ष काढून देशभरात या संघटनेवर बंदी घातली होती. कट्टरता वाद्यांची विद्यार्थी संघटना म्हणून तरुणांना या संघटनेकडे आकिर्षत केले जात होते.