परशुराम वाघमारेचा ताबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र एसआयटीचे प्रयत्न

0

बंगळूर-पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात शेवटचा सहावा संशयित परशुराम वाघमारेचा ताबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र एसआयटीने प्रयत्न सुरू केले आहेत. गौरी लंकेश यांची हत्या आपणच केल्याची कबुली कर्नाटक एसआयटीला दिली. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून केल्याची माहिती कर्नाटक एसआयटीने शुक्रवारी दिली. त्यामुळे महाराष्ट्र एसआयटीचे पथक वाघमारेचा ताबा घेणार आहे.

पानसरे कुटुंबीयांनीही वाघमारे याच्याकडे चौकशी करण्याची मागणी तपास यंत्रणेकडे केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांच्या हत्येप्रकरणी पहिल्यांदाच कर्नाटक तपास यंत्रणेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. वाघमारेला अटक झाल्यापासूनच महाराष्ट्र एसआयटी कर्नाटक एसआयटीसोबत संपर्कात होते. कोल्हापूर पोलीसही कर्नाटक एसआयटीच्या संपर्कात आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयित वाघमारे याचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने सहा आरोपींना अटक केली आहे. त्यातील पाच आरोपी महाराष्ट्रातील आहेत. गौरी लंकेश यांच्यासह कलबुर्गी आणि पानसरे या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय होता. जप्त केलेल्या गोळ्या आणि रिकाम्या पुंगळ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासल्यानंतर आलेल्या अहवालातून तसा दुजोराही मिळाला होता. ५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरू येथे गोळ्या घालून हत्या झाली होती.