जळगाव । खानदेश कॉम्प्लेक्स मधील मल्हारा ऑइल डेपोतील नोकरांनी ऑक्टाबर 2013 ते ऑक्टोबर 2014 या काळात 6 लाख 83 हजार 593 रुपयांचे कॅस्ट्रॉल कंपनीचे ऑइल परस्पर विक्री केले. या प्रकरणी एक वर्षानंतर 24 नोव्हेंबर 2015 रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील संशयीताला दीड वर्षानंतर शहर पोलिसांनी गुरूवारी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
खानदेश कॉम्प्लेक्समध्ये दिलीप पुखरात मल्हारा यांचे कॅस्ट्रॉल ऑइलचे घाऊक विक्रीचे दुकान आहे. या दुकानात समाधान रतिलाल पाटील (वय 29, रा. अकूलखेडा, ता. चोपडा), आनंद गिरधर अहिरे (रा. खेडी, ता. जळगाव) या दोघांनी संगनमताने ऑक्टोबर 2013 ते ऑक्टोबर 2014 या काळात 6 लाख 83 हजार 593 रुपयांचे ऑइल संबंधीत दुकानदारा पर्यंत न पोहचवता खोट्या सह्याकरून परस्पर विक्री केले. या प्रकरणी एक वर्षानंतर मल्हारा यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यात 22 जून 2016 रोजी आनंद अहिरे याला अटक केली होती. तो सध्या जामीनावर आहे. तर दुसरा संशयीत समाधान याला गुरूवारी अटककरून न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 16 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.