पराभवाचा वचपा काढण्यास टीम इंडिया उत्सुक

0

नागपूर : पहिल्या २० ट्वेंटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचे आव्हान आहे. यासाठी टीम इंडियाने जोरदार सराव केला असून दोन्ही मालिकेत पराभवाचा सामना करणारा पाहुणा इंग्लंडचा संघ विजयी आघाडी घेण्यासही उत्सुक आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये २९ जानेवारी (रविवारी) रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी यजमान भारत आणि पाहुणा इंग्लंड संघ शुक्रवारीच नागपुरात दाखल झाला.

दोन्ही संघाचा कसून सराव
तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत पहिल्या लढतीत विजय मिळवित १-० ने आघाडी घेणारा इंग्लंडच्या संघाने शनिवारी दुपारी सराव केला. मालिकेत बरोबरी साधण्यास उत्सुक असलेला भारतीय संघाने सकाळी दहा वाजता कसून सराव केला. कसोटी मालिका व वन-डे सामन्यांची मालिका जिंकणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी टी-२० सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. चाहत्यांमध्ये या लढतीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

भारताला विजयाची प्रतीक्षा!

व्हीसीएच्या जामठा मैदानावर याआधी टीम इंडियाने दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागल्याने इंग्लंडविरुद्ध विजयाचे खाते उघडण्याची प्रतीक्षा राहील. ९ डिसेंबर २००९ रोजी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने ५ बाद २१५ धावा उाभरल्या. भारताला ९ बाद १८६ धावांत रोखल्याने भारत २९ धावांनी पराभूत झाला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध १५ मार्च २०१६ रोजी टी-२० विश्वचषकातील सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडने ७ बाद १२६ धावा उभारल्यानंतर भारताला अवघ्या ७९ धावांत गुंडाळले.