पराभवाची जबाबदारी स्विकारत आंद्रेस इनिएस्टाची निवृत्ती

0

मॉस्को : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आंद्रेस इनिएस्टाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

इनिएस्टा हा आपल्या सहकाऱ्यांना पास देण्याबाबत तसेच मधल्या फळीत समन्वय साधण्याबाबत चतुरस्र खेळाडू मानला जातो. मात्र रशियाविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात त्याने निराशाजनक कामगिरी केली. पूर्ण सामन्यात स्पेनला केवळ एकच गोल नोंदवता आला होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनने हा सामना गमावला. इनिएस्टाने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते.

रविवारचा सामना हा माझ्यासाठी कारकीर्दीमधील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. काही वेळा कारकीर्दीची सांगता विजयाने किंवा आपण पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे होत नाही. पेनल्टी शूटआऊटद्वारे पराभव होण्यासारखे दुर्दैव नाही. हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात दु:खद दिवस आहे. ३४व्या वर्षी मी हा सामना खेळू शकलो, हीच माझ्यासाठी मोठी कामगिरी आहे. अत्यंत समाधानाने मी निवृत्त होत आहे, असे इनिएस्टाने सांगितले.

इनिएस्टाने स्पेनकडून १३१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला. त्याने २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने केलेल्या अप्रतिम गोलमुळेच स्पेनला अव्वल यश मिळाले होते. तसेच २००८ व २०१२च्या युरोपियन स्पर्धेतही त्याच्याच कामगिरीच्या जोरावर स्पेनला विजेतेपद मिळाले होते. रशियाविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर स्पेनच्या संघात एकमेकांवर दोषारोप करणे सुरू झाले आहे. स्पेनला २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सने हरवले होते, तर युरो २०१६ मध्ये इटलीने त्यांच्यावर मात केली होती. या पाठोपाठ यंदा विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्यामुळे त्यांच्या संघातील खदखद वाढली आहे. स्पेन संघाच्या मार्गदर्शक चमूमध्ये ऐन वेळी करण्यात आलेला बदल, त्यातही पहिल्या सामन्यापूर्वी दोनच दिवस अगोदर जुलेन लोपेतेगुई यांच्याऐवजी फर्नाडो हिएरो यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे देण्याचा निर्णयही या पराभवास कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.