माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा पक्षाला घरचा अहेर ; चुका दुरुस्तीसाठी वर्षभराची संधी
भुसावळ (गणेश वाघ)- पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तीन ठिकाणी भाजपाला बसलेला पराभवाचा फटका हा अॅन्टी इन्कमबन्सी फॅक्टरमुळे बसला असून पराभवाच्या कारणीमिमांसोबतच पक्षाला आता आत्मचिंतनाची गरज असल्याचे स्पष्ट मत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. शहरातील काशीराम नगरात उद्यानाच्या उद्घाटनासाठी खडसे आले असता ‘दैनिक जनशक्ती’ ने त्यांच्याशी संवाद साधला. खडसे म्हणाले की, एक वर्ष आगामी निवडणुकांना अवधी असल्याने पक्षाकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्या लागतील, असे ते म्हणाले. ‘जामनेर पॅटर्न’ खान्देशात यशस्वी होत असून याबाबत काय सांगाल यावर खडसे म्हणाले की, हे कुणा एका व्यक्तीचे यश नसून मतदारांनी दिलेला कौल आहे व तसे असते तर अहमदनगरलाही आमचा विजय झाला असता, आता पक्षाकडे प्रतिष्ठा, पैसा आला असून वातावरणही पक्षाच्या बाजूने आहे मात्र ज्या काळात हे काहीही नव्हते, आम्ही विरोधात होतो, त्या काळात आपण सत्ता मिळवल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेनंतरही नाही मिळाले यश
भाजपाच्या पराभवाबाबत माजी मंत्री खडसे म्हणाले की, तीन राज्यात भाजपाची सत्ता आली त्यावेळी ही राज्ये आजारी होती, तेथे पक्षाने चांगली विकासकामे केली, विकासदर कमी होता तो वाढविण्यात आला, मध्यप्रदेशचा विकासदर तर देशात सर्वात जास्त आणण्यात आला मात्र विकासापेक्षा मतदार दुसरीकडे वळाले. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा चांगली असून पक्षाचा पराभव झाला, अॅन्टी इन्कमबन्सी फॅक्टरचा पक्षाला फटका बसल्याचे ते म्हणाले. पराभवाची कारणे शोधावी लागतील, आत्मचिंतन करावे लागेल, झालेल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील, असा उपदेशही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला.
एक वर्ष चुका दुरुस्तीला वेळ
आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीचा फटका या निकालामुळे भाजप पक्षाला बसेल काय? या प्रश्नावर खडसे म्हणाले की, या निकालाचा परीणाम निश्चितच कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर झाला आहे मात्र त्यांना बळ देवून त्यांच्यात पुन्हा उत्साह वाढवणे गरजेचे आहे. अद्याप एक वर्ष निवडणुकांना अवधी आहे, ‘जे दुरावले आहेत त्यांना जवळ घ्यावे लागेल’, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
‘महाजन’ पॅटर्नपेक्षा विजयाचे श्रेय जनतेला
माजी मंत्री खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सख्य राज्याला ठावूक आहे तर खडसेंना बाजूला सारल्यानंतर महाजन प्रभावी नेते ठरू पाहत असून त्यांच्यावर दिलेल्या जवाबदारीनंतर सर्वच ठिकाणी भाजपाला यश मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंना धुळे व शेंदुर्णी निवडणुकीत ‘जामनेर पॅटर्न’ यशस्वी ठरला, याबाबत काय सांगाल? असे विचारले असता खडसे म्हणाले की, हा कोण्या एका व्यक्तीचा विजय नसून जनतेने पक्षाला दिलेला कौल आहे व तसे असतेतर अहमदनगरलाही भाजपा निवडून आली असती, असा टोलाही त्यांनी लगावला. महाजनांनी मिळवलेल्या यशाचे आपण स्वागतही केल्याचे त्यांनी नंतर सांगितले.
महाजन आताचे नेते, मी तर जेष्ठच -नाथाभाऊ
खडसेंना बाजूला सारून मंत्री महाजनांना संधी दिली याबाबत काय सांगाल यावर खडसे म्हणाले की, मंत्री महाजनांवर पक्षाने आता जवाबदारी टाकली आहे मात्र ज्या वेळा पक्षाची सत्ता नव्हती तेव्हा नाथाभाऊ एकटा लढला व सलग विजयश्री खेचून आणली, अशी आठवण खडसेंनी सांगितली. त्या काळात पक्षाकडे पैसा, प्रतिष्ठा काहीही नव्हती, पक्षाचा पायाही नव्हता तो रचण्यात आल्याचे त्यांनी सांगून यश हे यशच असते आपण त्याचे स्वागत करतो, असेही त्यांनी नमूद केले.