पराभवाच्या नैराश्यातून आरोप; मृणाल ढोले हे तर ब्लॅकमेलर!

0

पिंपरी-चिंचवड : मी कुणबी जातीचा असल्याचे 12 पुरावे जात पडताळणी समितीला दिले आहेत. हे सर्व पुरावे सबळ असून, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांची तक्रार फेटाळली जाणार असल्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे. तक्रारकर्ते मृणाल ढोले हे तर ब्लॅकमेलर आहेत. तर, विरोधक पराभवाच्या नैराश्यातून आरोप करत आहे, असे प्रत्युत्तर महापौर नितीन काळजे यांनी शनिवारी दिले. पिंपरी पालिकेचे महापौर नितीन काळजे हे मराठा जातीचे असून, त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी मृणाल ढोले आणि घनःश्याम खेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्याला पत्रकार परिषद घेऊन महापौर काळजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आरोप बिनबुडाचे, सर्व पुरावे आहेत!
महापौर काळजे म्हणाले की, माझे खापर पणजोबा, आजोबा कुणबी आहेत. पणजोबाचे भाऊ, बहिण, आजोबाचे भाऊ, बहिण कुणबी आहेत. शाळा, जन्म-मृत्यू, न्यायालय नोंदी, महसुली पुरावे माझ्याकडे आहेत. मी कुणबी असल्याचे माझ्याकडे असे एक नव्हे तर सतरा पुरावे आहेत. जातपडताळणी समितीला मी सबळ पुरावे दिले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात काही तथ्थ्य नाही. ते केवळ बिनबुडाचे आरोप करून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत आपली उच्च, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी आहे.

खेडकरांना पराभवामुळे नैराश्य आले!
माझी जात खोटी ठरवण्याचा अधिकार तक्रारकर्त्यांना कोणी दिला. ते समिती ठरवेल असे सांगत महापौर काळजे पुढे म्हणाले, त्यांचे तीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार फेटाळली जाणार असल्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे. तक्रारकर्ते मृणाल ढोले ब्लॅकमेलर आहेत. ते प्रत्येक कुणबी समाजातील व्यक्तीवर आक्षेप घेतात. कुणबी असलेल्यांना नाहक त्रास देतात. त्यांना भेटतात आणि त्यांच्याकडून पैसे घेतात. ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टीने ते आरोप करतात आहेत, असा आरोप महापौर काळजे यांनी केला आहे. विरोधक घनश्याम खेडकर दोनवेळा पराभूत झाले आहेत. त्यांना जनतेने नाकारले आहे. माझ्याविरोधात त्यांना केवळ दोन हजार मते पडली आहेत. त्यामुळे त्यांना नैराश्य आले असून, त्यातूनच ते माझ्यावर आरोप करत आहेत, असे महापौर काळजे म्हणाले.