पराभवानंतर ती अजून घरच्यांशी बोललेली नाही

0

मुंबई । महिला विश्‍वचषक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 86 धावांची संयमी आणि संघासाठी महत्वाची खेळी करणारी मुंबईकर पूनम राऊत पहिल्यापासूनच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मोठी चाहती आहे. सचिनची फलंदाजी बघून पूनम फलंदाजीतले अनेक बारकावे शिकली आहे. पूनमच्या या खेळीनंतरही भारताला विजेतेपदाच्या लढतीत नऊ धावांनी पराभव पत्कारावा लागला. पूनमचे पिता गणेश राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पूनम पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेली नाही, तिने सोमवारी संध्याकाळपर्यंत घरी फोनही केलेला नाही. गणेश राऊत म्हणाले की, आम्ही पूनमच्या फोनची वाट बघतोय, पराभवामुळे ती खूपच निराश झालेली आहे. त्यातून सावरल्यावर ती घरी संपर्क साधेल.

पूनमने विश्‍चषक स्पर्धेतील नऊ सामन्यांमध्ये 67.43 च्या सरासरीने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 381 धावा केल्या आहेत. क्रिकेटची बॅट हातात धरल्यापासून ती सचिनची चाहती आहे. पूनमचे वडील म्हणाले की, पूनमने सचिनच्या बहुतेक खेळी पाहिलेल्या आहेत. सचिनची फलंदाजी बघण्याची एकही संधी पूनम सोडायची नाही. सचिन ज्या पद्धतीने शॉट्स खेळायचा, फटके मारायचा ते बघून पूनमही तसाच खेळ करण्यासाठी मेहनत घ्यायची. मुंबई क्रिकेट संघटनेच्या वांद्रे कुर्ला संकुलातील क्रीडांगणात पूनम अर्जुन तेंडुलकरसह सराव कराताना पूनमला सचिनशी संवाद साधायची संधी मिळते.

बीसीसीआयचा सोहळा
आयसीसी महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाच्या सन्मान सोहळ्याची बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ टप्प्याटप्प्याने बुधवारनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या उपलब्धतेनुसार सन्मान सोहळ्याची तारीख आणि ठिकाण ठरवण्यात येणार आहे. या सोहळ्यात खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख आणि सहयोगी स्टाफला प्रत्येकी 25 लाख रुपयांचे धनादेश देण्यात येतील. या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

महिला आयपीएलसाठी हीच योग्य वेळ
आयसीसी महिला विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास घडवण्यापासून वंचित राहिलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने महिला आयपीएल सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले. अंतिम सामन्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मिताली म्हणाली की, महिला बिग बॅश लीगमध्ये खेळल्यामुळे स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरच्या खेळ खूप सुधारला आहे. या दोघींना त्याचा अनुभव आला आहे. मितालीने यावेळी महिला आयपीएल स्पर्धेचे जोरदार समर्थन केले. मिताली म्हणाली की, लीगमुळे जास्तित जास्त खेळाडूंना खेळायचा अनुभव मिळेल, त्यातून भारतीय संघाचाच फायद होईल. अंतिम सामन्यात पराभूत होऊनही मितालीने ही विश्‍वचषक स्पर्धा स्वत:साठी विशेष असल्याचे म्हटले आहे.