पराभूत मनोवृत्ती

0

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी आपल्याच पक्षाची संभावना पराभूत मनोवृत्ती अशी केली आहे. उरलीसुरली काँग्रेसही दिवाळखोरीत जाण्याची ही लक्षणे आहेत. कारण मोइलींनी सध्याच्या काँग्रेस नेतत्वावरच तोफ डागलेली असून, त्यांचा रोख राहुल गांधी व त्यांच्या भोवताली जमलेल्या चौकडीवर आहे. कारण स्पष्ट आहे. मोईली यांच्यासारख्या मुरब्बी व जाणत्या नेत्याला पक्ष दिवसेंदिवस कसा डबघाईला चालला आहे? ते उघड्या डोळ्यांनी बघावे लागते आहे. मात्र, त्यावर कोणी बोलायची हिंमत करू शकलेला नाही. ज्यांनी कोणी तशी हिंमत केली, त्यांना गप्प बसवण्यात आले किंवा पक्षातून बाहेर पडायची वेळ आणली गेली. हे गेल्या चार वर्षांपासून चालू आहे आणि जेव्हा सहन करण्यापलीकडे स्थिती जाते, तेव्हाच असे अनुभवी नेते बोलून जातात. सध्या काँग्रेसने मतदान यंत्राविरोधात भूमिका घेतली आहे आणि ती चुकीची असल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा जिंकत असतात, तेव्हा यंत्रात दोष वा गडबड नसते आणि तुम्ही पराभूत व्हायला लागला, मग त्यात गफलती असल्याचा आरोप कोणी मान्य करीत नसतो. यंत्रामध्ये गफलत असती, तर पंजाबात काँग्रेस जिंकली नसती आणि गोव्यातही भाजप पराभूत झाला नसता. हे इतके स्पष्ट असताना मायावती वा केजरीवाल यांच्यासारख्यांनी घेतलेल्या आक्षेपांचा पाठपुरावा काँग्रेस करते आहे. त्यामुळे हा शतायुषी पक्ष देशभर हास्यास्पद होऊ लागला आहे. त्याच वेदनेतून मोईलींनी आपले तोंड उघडलेले असावे. पण, त्यानिमित्ताने त्यांचे दुखणे बाहेर पडले आहे. त्यांनी पक्षांतर्गत चाललेल्या गोंधळालाच यातून वाचा फोडली आहे. त्यातून ते किती बचावतील? ते काळच सांगेल. मात्र, त्यांच्या बोलण्याने काँग्रेस कशी अधिकाधिक भरकटत चालली आहे, त्याची साक्ष देणारा साक्षीदार काँग्रेसच्या घरातूनच पुढे आला आहे.

मतदान यंत्र ही काँग्रेस व यूपीएने देशाला दिलेली बहुमोल भेट आहे. त्याचे श्रेय घेण्यापेक्षा त्यावरच आज काँग्रेस शंका घेत असल्याने मोईली विचलित झाले आहेत. कारण यूपीएच्या कालखंडात तेच देशाचे कायदामंत्री होते आणि निवडणूक आयोगाशी त्यांनाच संपर्क ठेवावा लागत होता. याच कालखंडात त्यांनी आयोगाशी निवडणूक सुधारणांविषयी अनेक चर्चा व विचारविनिमय केलेले होते. खेरीज मतदान यंत्रात सुधारणा करून ते अधिकाधिक निर्दोष बनवण्याचा खटाटोप त्यांच्याच कारकिर्दीत झाला आहे. असे असताना आज त्यावरच खापर फोडण्याने काँग्रेस पक्ष हास्यास्पद होतो आहे. किंबहुना, अशी तक्रार निकालानंतर लगेच मायावतींनी केली होती. पण, काँग्रेस पक्षाने केलेली नव्हती अन्य पक्षांचे आक्षेप उचलून त्यावर उशिरा भूमिका घेण्याने आपली प्रतिष्ठा पक्ष गमावतो आहे, असेही मोईलींना वाटते आहे. पण, त्याहीपेक्षा या भूमिकेमागे पराभूत मनोवृत्ती असल्याचा त्यांचा आक्षेप गंभीर आहे. ज्याची कुवत नसते आणि ज्याला लढून जिंकता येत नाही, तोच नेहमी व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह लावत असतो. सध्या काँग्रेसची अवस्था तशीच झालेली आहे. उत्तर प्रदेश जिंकायचा निर्धार करून आरंभलेली मोहीम मध्येच सोडून, अखेरच्या टप्प्यात समाजवादी पक्षाशी युती करणे, ही पराभवाची भीती होती. इतके करूनही पक्षाला दहा जागाही जिंकता आल्या नसतील, तर काय चुकते आहे? ते शोधण्याची गरज असते. आत्मपरीक्षण आवश्यक असते. दुसर्‍यावर नुसता दोष ढकलून आपली परिस्थिती सुधारत नाही. दुसर्‍याने लबाडी केलीही असेल, पण त्याच्या यशाला आपला नाकर्तेपणाही काहीसा कारणीभूत असतो. तो नाकर्तेपणा शोधून सुधारण्याची गरज असते. त्याचा कुठलाही मागमूस दिसलेला नाही. हे जगाला भासलेले आहेच. पण, मोईलींसारख्या वरिष्ठ नेत्यानेच सांगितल्याने आतले सत्य जगासमोर आलेले आहे.

आपले अपयश वा नाकर्तेपणा अन्य कुणाच्या माथी मारायचा, ही आता काँग्रेसी नीती झाली आहे. लोकसभेतील पराभवाची कारणे शोधली गेली नाहीत. त्यापेक्षा मोदींनी प्रचार व जाहिरातीने मतदाराला भुलवल्याचा निष्कर्ष काढून, आपल्या पराभवावर पांघरूण घातले गेले. मग नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला, तेव्हा मतदाराची फसगत झाल्याचाच निष्कर्ष काढला गेला. पण, मतदार काँग्रेसपासून कशाला दुरावतो आहे, त्याची कारणे शोधण्याचा प्रयासही झालेला नाही. आता जाहिराती व प्रचाराला दोष देता येत नसल्याने, मतदान यंत्रावरच गडबडीचा आरोप करून पळवाट काढली गेली आहे. हा धादांत खोटेपणा आहे, हे मोईलींना कळते आणि त्यांचे मन अस्वस्थ झाले आहे. कारण अशा थातूरमातूर खुलाशांनी पुन्हा पक्षाची स्थिती सुधारण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण काँग्रेसपासून मतदार दुरावतो आहे व तो मागे आणला नाही, तर पुढल्या काळात काँग्रेस खरेच अस्ताला जाण्याचा धोका आहे, हे त्यांना कळते. पण, हे सत्य राहुलच्या गळी उतरवणे कोणाही नेत्याला शक्य झालेले नाही. राहुल पक्षाचा पुनरुद्धार करू शकत नाही आणि आपणही त्यात कुठला बदल करू शकत नाही, अशा धारणेने काँग्रेस नेत्यांना पछाडलेले आहे. त्यामुळेच आपले अपयश लपवण्यासाठी कुठले ना कुठले कारण वा निमित्त शोधून जबाबदारी झटकली जात असते. मोईली यांनी त्याच दुखण्यावर नेमके बोट ठेवले आहे. त्यांनी पराभूत मनोवृत्ती, हा शब्द अतिशय विचारपूर्वक योजला आहे. पराभवातून सावरण्याची इच्छाही काँग्रेसचे विद्यमान नेते गमावून बसले आहेत. म्हणूनच मग आपल्यामुळे पराभव झालेला नाही, हे सिद्ध करण्याची शर्यत सुरू असते. भाजप जिंकला नाही तर त्याने लबाडी केली, असे म्हटल्यावर नेतृत्वातील त्रुटी लपवता येतात. त्याच चलाखीवर मोईली यांनी बोट ठेवले आहे. मात्र, त्यामुळे त्यांना वनवासात धाडले जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये सोनिया वा राहुल गांधी कितीही चुकले तरी चुकत नसतात, हा नियम आहे. साहजिकच त्यांच्या चुका झाकणे वा त्याचे खापर अन्य कशावर तरी फोडणे, हे प्रमुख काँग्रेस नेत्यांचे कर्तव्य होऊन राहिले आहे. अशा स्थितीत काँग्रेसचा वारंवार पराभव होत असेल, तर त्यापासून नेतृत्वाला सुरक्षित करण्याची कामगिरी नेत्यांनाच पार पाडावी लागत असते. त्यात कसूर करणार्‍याला काँग्रेसमध्ये नेता म्हणून मिरवता येत नाही. अशाच लोकांचा घोळका आजकाल राहुल गांधींना घेरून बसलेला असल्याने, खडेबोल वा सत्य ऐकवणार्‍यांना तिथे स्थान उरलेले नाही. मोईली त्यापैकीच एक असल्याने त्यांना पक्षाच्या भूमिका व धोरणे ठरवण्यात सहभागी करून घेतले जात नाही. तेही त्यांनी स्पष्ट केले. पण, त्यांची वेदना व्यक्तिगत नसून ढासळत चाललेल्या पक्षाविषयीची आहे. कारण यंत्रावर किंवा अन्य पक्षांवर पराभवाचे खापर फोडून, काँग्रेसला पुन्हा बाळसे येण्याची बिलकूल शक्यता नाही. नव्या भूमिका व जनहिताचे विषय घेऊन काम केल्यासच मतदार पक्षाकडे पुन्हा वळू शकेल. जसे पंजाबात जनतेत मिसळून अमरिंदर सिंग यांनी यश मिळवले. पण, तशा लोकांना राहुल जवळ येऊ देत नाहीत. त्यामुळेच जगाला चुकीचे ठरवणार्‍यांचा गोतावळा राहुल गांधी यांच्या भोवती जमला आहे आणि त्याची तटबंदी ओलांडून नेतृत्वापर्यंत पोहोचणे मोईलीसारख्यांनाही शक्य राहिलेले नाही. असेच लोक काँग्रेसला पराभूत वृत्तीकडे ढकलून नेत आहेत आणि आपण काही करू शकत नाही, अशा यातना मोईलींनी बोलून दाखवल्या आहेत. किंबहुना, त्यातून काँग्रेस आता जिंकण्याचा विचारही करायचे विसरून गेली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. कदाचित, पुढली लोकसभा निवडणूक येईपर्यंत त्यांच्यासारख्याला पक्षात स्थान तरी शिल्लक उरेल किंवा नाही, याची शंका आहे. पण, त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत केली तर त्यांचे कौतुक व्हायलाच हवे.