जळगाव । महाराष्ट्र शासनाच्या राजेश अग्रवाल समितीने परिक्षा पध्दतीत पारदर्शीपणा आणण्यासंबंधी काही सुचना केल्या होत्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने समितीच्या अहवालातील बहुतांश सुचना पूर्ण केल्या. परिक्षा पध्दतीत पारदर्शीपणा आणण्याच्या दृष्टीने उमवीने एक अभिनव उपक्रम सुरु केले असून ते म्हणजे सत्र परिक्षा दिल्यानंतर परिक्षेची उत्तर पत्रिका तपासणीनंतर उत्तर पत्रिका थेट विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात येत असून तपासलेल्या उत्तर पत्रिकेबाबत विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करण्यात येत आहे. सोमवारी 27 नोव्हेंबरपासून उमवीतील भौतिकशास्त्र प्रशाळेत या उक्रमास सुरुवात करण्यात आल्याची माहिती कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भौतिकशास्त्र विभागाच्या प्रथम सत्रापासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून भविष्यात उमवीतील सर्व प्रशाळेत वहा उक्रम सुरु केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
असा आहे उपक्रम
सत्र परिक्षा दिल्यानंतर संबंधीत विषय शिक्षकांकडून उत्तर पत्रिका तपासली जाते. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना गुणदान केले जाते. मात्र निकाल घोषीत केला जात नाही. निकाल घोषीत करण्याअगोदर तपासलेल्या उत्तर पत्रिकेबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असेल तर त्यांनी मांडाव्यात, संबंधीत विषय शिक्षकांनी त्या शंकेचे निरसन करावे असा हा उपक्रम आहे. या उक्रमाला ‘ओपन डे’ असे नाव देण्यात आलेले आहे. विद्यापीठांतर्गत येणार्या सर्व महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरु करणे शक्य नसल्याने पदव्युत्तर महाविद्यालय असलेल्या सर्व विज्ञानशाखेत हा उपक्रम भविष्यात सुरु करण्यात येईल असे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद
परिक्षा दिल्यानंतर संंबंधीत शिक्षकांनी दिलेल्या गुणदानाबद्दल शंका असतांनाही ते विचारण्याची मुभा दिली जात नव्हती मात्र आता विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेली उत्तर पत्रिका हातात मिळणार असून शंकेचे निरसन होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोमवारी भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या परिक्षेची उत्तर पत्रिका त्यांच्या हातात देण्यात आली व त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले त्यामुळे त्यांच्या चेहर्यांवरील आनंद ओसांडून वाहत होता. तसेच परिक्षेतील चुकाही त्यांच्या लक्षात आल्या.
देशातील पहिलीच विद्यापीठ
परिक्षा पध्दतीत पारदर्शीपणा आणण्यासाठी अग्रवाल समितीने सर्व विद्यापीठांना काही सुचना केल्या आहेत. सूचनेला अनुसरुन उत्तर पत्रिका परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या हातात देवून शंकेचे निरसन करण्याचा उपक्रम विद्यापीठाने सुरु केला आहे. हा उपक्रम राबविणारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ देशातील एकमेव विद्यापीठ असेल असा दावा कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी केला आहे.
तज्ज्ञांची उपस्थिती
विद्यार्थ्यांनी तपासण्यात आलेल्या उत्तर पत्रिकेबाबत काही शंका उपस्थित केल्यास त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी संबंधीत शिक्षक तर उपस्थितीत होतेच सोबतच आण्विक विज्ञान (न्युक्लिअर सायन्स)क्षेत्रातील वैज्ञानिक राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शंकेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कुलगुरु हे स्वतः भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असल्याने ते देखील यावेळी पुर्णवेळ उपस्थित होते. ओपन डे-साठी प्रा.एस.टी.बेंद्रे, प्रा.आर.बी.गोरे यांनी परिश्रम घेतले.