अलिबाग : आभाळच फाटलंय… तर ठिगळ कुठे लावायचे… असे म्हणतात. रायगड जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाला भेट दिल्यावर याचा प्रत्यय येतो. असुविधा, अस्वच्छता आणि असुरक्षिततेच्या गर्तेत गेली अनेक वर्षे याठीकाणी विद्यार्थिनी नरकयातना भोगत आहेत. इमारत केंव्हाही कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मात्र कुंभकर्णी झापेचे सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांना अजून जाग येत नसल्याचे दिसून येते. परिचर्चा प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थिनींसाठी सरकारतर्फे विविध योजना राबविण्यात येतात. परंतू या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाची इमारत पाहिल्यानंतर दिसून येते. येथे अत्याधुनिक तर सोडाच विद्यार्थिनींना मूलभूत सुविधाही उपलब्ध होत नसल्याचे भयानक वास्तव समोर येते. या इमारतीत 1959 पासून ए.एन.एम हे परिचर्या प्रशिक्षण देण्यात येते, तर 2010 पासून जे.एन.एम. प्रशिक्षण सुरु करण्यात आले. सध्या येथे एकूण 94 विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. पण या विद्यार्थिनी आज ज्या वातावरणात प्रशिक्षण घेत आहेत ते पाहिल्यावर याला प्रशिक्षण म्हणायचे का हा प्रश्न निर्माण होतो.
मूलभूत सुविधांचीही वानवा
महत्त्वाची गोष्ट म्हणजे एएनएम प्रशिक्षण देण्यासाठी ही इमारत पूर्वी वापरात होती. मात्र 2010 पासून येथे जेएनएम परिचर्या प्रशिक्षणही सुरु करण्यात आले. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रामातील विद्यार्थिनींना जागेची कमतरता भासत आहे. वर्गखोल्यांची तसेच राहण्याच्या खोल्याची कमतरता विद्यार्थिनींना भेडसावत आहे. दाटीवाटीने खोल्यांमध्ये विद्यार्थिनी राहत आहेत. बसायला धड जागा नाही, ना अभ्यास करायला स्वतंत्र जागा. त्याचबरोबर न्हाणीघर व शोचालयांची कमतरताही विद्यार्थिनींना भेडसावत आहे. आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. इमारत कधी कोसळेल त्याचा नेम नाही.
या इमारतीला 55 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. खिडक्यांची दुरावस्था झाली आहे, ठीकठीकाणी स्लॅब पडाला असून, लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. स्लॅबमधून पाणी झिरपत आहे. सांडपाणी इमारतीच्या बाजूलाच वाहत आहे. खोल्यांमध्ये कुबट वातावरण तयार होऊन या सर्व विद्यार्थिनींच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, अवस्थेत जीव मुठीत धरुण जगण्याची वेळ परिचर्या प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थिनींवर आली आहे. परिचर्चा प्रशिक्षण केंद्राची इमारतीची दुरावस्था झाली असल्याने, प्रशिक्षण केंद्र व जिल्हा रुग्णालयाने वेळोवेळी इमारतीची डागडुजी करावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. भितींचे प्लॅस्टर पडले आहे. स्लॅबही ठिकठिकाणी पडला आहे. सांडपाण्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीची तातडीने डागडुजी करावी यासाठी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.
– जे. एस. मोरे
प्राध्यापिका, परिचर्या प्रशिक्षण केंद्र
परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची डागडुजी करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आहे. या इमारतीची पहाणी करुन खर्चाचे अंदाजपत्रकही तयार केले आहे. नियोजन मंडळाकडे हे अंदाजपत्रक सादर केले असून, खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर इमारतीच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येईल.
-विलास पाटील
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.