मुंबई – सैनिकांच्या पत्नींविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे सदस्यत्व कायमचे निलंबित करावे, अशी मागणी सोमवारी विरोधकांनी विधान परिषदेत केली. परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आबालवृद्धांपासून प्रत्येकजण सैनिकांना मान देतो. अशा सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींविषयी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना तातडीने निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्याला अनुमोदन देत हा मुद्दा जितका संवेदनशील, तितकाच भावनात्मक आहे. या वक्तव्याविरोधात सैनिकी संघटनाही रस्त्यावर उतरल्या. सैनिकांबाबत इतक्या गलिच्छपणे भरसभेत वक्तव्य करणे चुकीचे असून ते परिषदेतील आमदार असल्याची आम्हाला लाज वाटते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी भाई जगताप यांनी केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर या आमदाराला फासावर द्या, असे म्हणाले असते, असे सांगत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करणे, निवडणूक काळातील स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र, देशाच्या सीमांचे आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करणे, योग्य नाही. परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. या सभागृहाची वैचारिक बैठक आहे, असे हेमंत टकले म्हणाले. माफी मागून किंवा निषेध करून या घटनेला पूर्णविराम देता येणार नाही. असे घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि नथुरामी प्रवृत्तीला ठेचले गेले पाहिजे, असे कपिल पाटील म्हणाले.
यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व बाबी तपासून यासंदर्भात मार्ग काढला जाईल अशी ग्वाही दिली. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सभापतींनी गटनेत्यांची बैठक घ्यावी. या बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असेल असे सांगितले. मुख्यमंत्र्यानी प्रस्ताव आणला नाही तर विरोधकांकडून परिचारक यांच्या निलांबनाचा प्रस्ताव आणला जाईल आणि जोपर्यंत परिचारक यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे शरद रणपिसे यांनी सांगितले.