परिवर्तनाची लाट सुरू झालीय

0

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती जयंती नटराजन यांची देशाच्या संरक्षणमंत्री पदावर निवड झाली त्याच आठवड्यात जेएनयूमध्ये झालेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांनी आपले वर्चस्व कायम ठेवले, तर दिल्ली विद्यापीठामध्ये काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे, मुंबई विद्यापीठाचे अजून पूर्ण निकाल लागलेले नाहीत.

केंद्रामध्ये मोदी सत्तेवर आलेल्याला 3 वर्षे 4 महिने झाले आहेत. निवडणुकीला आता एक वर्ष 8 महिने आहेत. अशा वेळी देशातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे याची ही छोटीशी झलक म्हणता येईल.राजकीय वार्‍याची दिशा आणि तरुणांच्या मनातील कौल दाखवणारी वाटते. जेएनयूच्या या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन, स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट फेडरेशन या डाव्या विचारांच्या संघटनांनी एकत्र येत युनायटेड लेफ्ट पॅनल स्थापन करून ही निवडणूक लढवली होती. त्यांच्या समोर अभाविप आणि बिरसा-फुले-आंबेडकर स्टुडंटस असोसिएशन (बाप्सा ) या विद्यार्थी संघटना लढत देत होत्या. जेएनयूमध्ये दोन वर्षांपूर्वी कन्हैया कुमारला देशद्रोही ठरवून अटक करण्यात आली होती, तेव्हापासून अभाविप आणि डाव्या संघटनामध्ये हा संघर्ष तीव्र झाला होता. जेएनयूमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे या उद्देशाने अभाविपने दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. मोदी सरकार आल्यापासून या सरकारने आणि त्यांच्या समर्थकांनी जेनयूला लक्ष्य केले होते.विद्यार्थी संघाच्या निवडणुकीआधी या विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या जयंती नटराजन यांची केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्रीपदी निवड झाली होती, तरीही या विद्यापीठातील मुलांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण या विद्यापीठात शिकणारी बहुतांश मुले ही विवेकी विचार करणारी आहेत, शिक्षणाचा आणि बुद्धीच्या विवेकाने वापर करणारी आहेत. त्यामुळे चांगलं, वाईट, प्रतिगामी, पुरोगामी विचारांची जाणीव या मुलांमध्ये आपसूक आलेली असावी. त्याचा हा परिपाक असावा. जन्मतः कोणी पुरोगामी, डावा नसतो तर तो आजूबाजूच्या वातावरणातून, वाचन, मनन आणि अभ्यासातून, प्रश्‍न विचारण्यातून, चिकित्सा करण्यातून घडत असतो आणि अशी ही घडणारी मुले देशभरच्या विद्यापीठातून अस्वस्थ झालेली आपल्याला दिसत आहेत. मुंबई विद्यापीठातील परीक्षेचे निकाल अजूनही पूर्णपणे लागलेले नाहीत. अनेक विद्यार्थी संघटना यासाठी आंदोलने करीत आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना कुलपती व महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे. परंतु, परत विद्यापीठात येण्यासाठी डॉ. देशमुख मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत जे प्रयत्न करताहेत यामुळे विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. निवडणुकीला दीडवर्षे बाकी असताना शिक्षण, रोजगार या आघाडीवर काय चित्र आहे.

दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण होतील, पंधरा लाख खात्यात जमा होतील, असे सांगत सत्तेवर आलेल्या सरकारने या तीन वर्षांत किती रोजगार निर्माण केले? उलट नोटाबंदीनंतर अनेक ठिकाणी मंदी आलेली आहे. शिक्षणाबाबतीत तर आनंदी आनंद आहे. बँकेवरून शिक्षकांचे पगार अडवले आहेत. दलित, आदिवासी, मुस्लीम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे, कष्टकरी मुलं शिकतात त्या रात्रशाळा शेवटच्या घटका मोजताहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी शिका, हे राजीव गांधी यांच्या काळापासून आलेले नवीन शिक्षण धोरणात काडीचाही बदल नव्या सरकारने केलेला नाही. मात्र, इतिहासात ढवळाढवळ सुरू केलेली आहे. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. परंतु, या अस्वस्थतेला संघटित करणारी शक्ती आज तरी दृष्टिक्षेपात नाही. पण ती ज्या दिवशी उभी राहील त्या दिवसापासून या सरकारच्या लोकप्रियतेला ग्रहण लागायला सुरुवात होईल. कारण इतिहासात तसा दाखला मिळतो. 1974-75मध्येच गुजरातमधूनच उभे राहिलेले नवनिर्माण आंदोलनातून सत्ता परिवर्तनामध्ये कधी बदलले हे त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आले नव्हते. त्यामुळे जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी जी पायवाट दाखवली आहे त्यातूनच नवा राज मार्ग देशात निर्माण होईल.

-शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल,मुंबई
9224576702