एमन परिवर्तन, मत परिवर्तन, समाज परिवर्तन, व्यवस्था परिवर्तन, सत्ता परिवर्तन असे परिवर्तनाचे अनेक आयाम सांगता येतील़ माणूस भौतिक आणि चंगळवादाच्या भोवर्यात अडकल्याने त्याची भुक सारखी वाढते आहे़ त्यातून काही प्रश्न निर्माण होत आहेत़ अशा माणसाच्या मन परिवर्तनाचा मार्ग काय याची कारण मिमांसा आधुनिक सत्संगी बापू, महाराज, बुवा यांनी ओळखून माणसाला सुखं म्हणजे काय ? या स्वप्नात गुंतविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो़ पूर्वी बोटावर मोजण्याइतके आधुनिक बापू दिसायचे़ आता अशा हजारो बापूंची संख्या अचानक वाढण्याची कारणे काय असावीत ? माणसाला मन:शांती हवी आहे आणि ती फक्त सत्संगातून प्रवचनातून मिळू शकते असा भास निर्माण झाल्याने अशा सत्संगांना वाढणारी गर्दी हे कशाचे द्योतक आहे असा प्रश्न पडतो़
मत परिवर्तनाचा विषय हा समाज आणि व्यवस्था परिवर्तनाशी निगडीत आहे़, असे मला वाटते़ माणूस जसा प्रगत झाला तशी त्याची वैचारिक कुवत, क्षमता आणि आकलन शक्तीही प्रगत झाली़ चांगल्या वाईटाचा तो विचार करु लागला़ आपल्या तुपल्याची जाणीव त्याला झाली़ त्यातून मग मी, माझे कुटूंब, माझं घर, माझे गाव, माझा समाज असे माझेपण त्याच्या ठायी निर्माण झालेले दिसले़ मग त्यात भेदाभेद, उच्च-निचता, जाती प्रजाती असे प्रकार पुढे आले़ आणि त्यातूनच पुढे जाता जात नाही, ती जात निर्माण झाली़ आज जातीअंताचा प्रश्न यामुळेच जटिल झाला आहे़ जातीअंताची लढाई करत असतांना व्यवस्था परिवर्तन अपेक्षित वाटू लागले़ आहेरे आणि नाहीरे असा वर्ग निर्माण झाला़ शोषक आणि शोषितांचा एक वर्ग निर्माण झाला़ भांडवलदार आणि कामगारांचा वर्ग निर्माण झाला़ वर्ग लढा हा महाराष्ट्र भारत किंवा देशापुरता मर्यादित नसून वर्ग लढ्याची समस्या ही आता जागतिक स्तरावर निर्माण होऊ लागली आहे़
सामाजिक परिवर्तनाचा विषय मोठा व्यापक आहे़ समाज परिवर्तन झाले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते़ अशा प्रसंगी परिवर्तनाची व्याख्या नेमकी काय असावी ? काय केले किंवा काय नाही केल्याने सामाजिक परिवर्तन होईल हे ठामपणे सांगता येत नाही़ समाज आणि सामाजिक व्यवस्था यामध्ये परिवर्तन आणायचे असेल तर पुन्हा माणसाचे मनपरिवर्तन, मत परिवर्तन हे आलेच़ अशिक्षीतांना सुशिक्षीत करणे, बेकारांना कामाला लावणे, व्यवसाय आणि उद्योगांची वृद्धी करणे यातून सामाजिक परिवर्तन अपेक्षित आहे़ पण यासाठी शिक्षण, रोजगाराभिमुख व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण देणार्या पायाभूत सुविधा भक्कम असणे गरजेचे आहे़ सर्व शिक्षा अभियान राबवून किंवा शिक्षण हक्काचा कायदा करुनही शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते हे प्रगत म्हणविणार्या देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी शोकांतिका आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरत नाही़
प्रगतशील असूनही जातपंचायतींचे फतवे निघतात़ महिलांवर अन्याय, अत्याचार होतात़ बहिष्कार घातला जातो़ प्रसंगी जिवे ठार मारले जाते़ ही माणूस प्रगत झाला आहे की माणसाची मती कुंठीत झाली आहे, असा प्रश्न निर्माण करणारी समस्या आहे़ मग भौतिक आणि वैज्ञानिक प्रगती करुनही माणूस असा पशुवत का वागतो़ यासाठी आणखी कोणते परिवर्तन अपेक्षित आहे हा यक्षप्रश्न सातत्याने निरुत्तरीत राहतो़
अलीकडे शाररिक परिवर्तनाची एक फॅशन येऊ घातली आहे़ लिंग परिवर्तनाचे प्रयोग जागतिक स्तरावर सुरु आहेत़ त्यात भारतही मागे नाही़ देशात आणि जगात तृतीय पंथीयांची संख्या झपाट्याने वाढते आहे़ आहे त्या तृतीय पंथीयांना समाज स्वीकारत नाही़ त्यांना मुळ प्रवाहात यायचे आहे़ पण त्यांच्या समोर समस्यांचा डोंगर उभा आहे़ अशा परिस्थीतीत युवकांमध्ये लिंगपरिवर्तनाचं खुळ निर्माण होणे ही सामाजिक समस्या पुढे भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही़ हे परिवर्तन समाजाला अधोगतीकडे नेणारे आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही़
गतकाळाची होळी झाली,
धरा उद्याची उंच गुढी,
पुराण तुमचे तुमच्यापाशी,
ये उदयाला नवी पिढी
गतकाळातला, इतिहासातला विचार टाकून देत नवा विचार स्विकारत नवी पिढी लोकलकडून ग्लोबलकडे वाटचाल करते आहे़ मात्र, इतिहासाला सोबत घेतल्याशिवाय वर्तमानाचे ध्येय गाठता येत नाही किंवा इतिहास विसरुनही चालत नाही़ डिजीटल झालेल्या नव्या पिढीच्या हातात आलेला मोबाईल, घराघरात पोहचलेला टिव्ही, कॉम्प्युटर ही परिवर्तनाची साधने आहेत हे नाकारता येत नाही़ मात्र, ती दुधारी शस्त्रे आहे हेही विसरुन चालणार नाही़ दोन वर्षाच्या मुलापासून शंभरीकडे वाटचाल करणार्या आजोबांनाही मोबाईलने भुरळ घातली आहे़ यामुळे घराघरातला संवाद कमी झाला आहे़ यातून बाहेर पडावे असे वाटणे किंवा अशा पिढ्या मोबाईलपासून दूर ठेवणे आता अशक्य आहे. मात्र यासाठी परिवर्तन अपेक्षित आहे़ भविष्यात मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही मुक्त समाज निर्माण व्हावा अशा अपेक्षा किंवा गरज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
मूल्यांच परिवर्तन हा एक मुद्दा मला चिंताग्रस्त करत असतो़ शेअर बाजारात रुपयाच अवमूल्यन होण्यापेक्षा मूल्यांच अवमूल्यन होतांना पाहून खंत वाटते़ त्यासाठी मूल्यशिक्षणाची व्यवस्था सरकारला अभ्यासक्रमात करावी लागते, यासारखे दुर्दैव कोणते असू शकते़ परिवर्तन अपेक्षित आहे, नव्हे ती निरंतर प्रक्रिया आहे़ पण त्यासाठी माणूस सजग असला पाहिजे़ त्याने योग्य अयोग्य काय आहे याचा विवेक आणि संवेदनशिल मन असणे ही आता काळाची गरज होणार आहे़ कुण्या अनामिक शायराचा विचार दिशा देणारा वाटतो तो असं म्हणतो
मनजर को बदलो, नजारे बदल जाते हैं,
सोच को बदलो, सितारे बदल जाते हैं,
कश्तियॉ बदलनेसे समाधान नही मिलता,
धार को बदलिये किनारे बदल जाते हैं
आज सर्वसामान्य माणसाला विचार परिवर्तन आवश्यक आहे, असे वाटते़
अनिल पाटील
निवासी संपादक
दैनिक एकमत,
-मो. 7774007930