परिवहनच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चा आवाज!

0

कोल्हापूर । कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ ही घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधींचं पद रद्द करण्याचा इशारा देऊन सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्नाटक सरकारला शिवसेनेनं चोख उत्तर दिलं आहे. शिवसैनिकांनी कोल्हापुरात आलेल्या कर्नाटक परिवहनच्या बसवरील कर्नाटकचा उल्लेख पुसून त्याऐवजी ‘जय महाराष्ट्र’ केलं. तसेच कर्नाटक सरकारमधील मंत्री रोशन बेग यांचाही निषेध नोंदवला. सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच त्यांनी या आंदोलनातून दिला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कोल्हापूर बसस्थानकात आंदोलन करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. बसस्थानकात आलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसवर स्प्रे पेंट करून कर्नाटकऐवजी ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख करत जोरदार घोषणाबाजी केली. तत्पूर्वी, कर्नाटकात जय महाराष्ट्रची घोषणा दिल्यास लोकप्रतिनिधींचं पद रद्द करण्याचा इशारा काल कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी बेळगावमध्ये दिला होता. यासंबंधी नवा कायदा कर्नाटक सरकार आणणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर आज शिवसेनेनं कोल्हापुरात आंदोलन करून मराठीबहुल भागातील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकारकडून सुरू असलेली गळचेपी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.