परिवहन विभागाचा 254 कोटींचा अर्थसंकल्प

0

नागपूर । नागपूर परीवहन विभागाचा 254 कोटी 45 लाखांचा अर्थसंकल्प परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी परिवहन विभागाचे स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासमक्ष सादर केला. त्यापासून 254 कोटी 56 लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित आहे. शहरातील प्रवासी नागरिकांच्या गरजेनुसार अधिकाधिक चांगली सेवा प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच महसुली उत्पन्नाचा योग्य प्रकारे वापर करून अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्याचा मानस कुकडे यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेतर्फे ‘आपली बस’ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. प्ले-स्टोअरमध्ये ते उपलब्ध आहे. येणार्‍या थांब्यावर बस कोणत्या वेळेत येईल, त्या बसमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे की नाही याची माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना मिळू शकेल.

प्रवाशांसाठी विविध सुविधा करणार प्रदान
प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच तक्रारी नमूद करून त्यांचे निवारण करण्यासाठी लवकरच ‘टोल फ्री’ आणि ‘वॉटसअ‍ॅप’ क्रमांक प्रत्येक बस आणि बस थांब्यावर प्रसारीत करण्यात येणार असल्याचेही सभापती कुकडे यांनी सांगितले. नियोजित आणि अस्तित्वात असलेल्या विविध बस थांब्याच्या बाजूच्या जागेवर कॅन्टीनकरिता जागा उपलब्ध करून बस थांब्याची काळजी कॅन्टीन चालविणार्‍याकडे राहील, अशीही भविष्यातील व्यवस्था असेल, अशी माहिती बंटी कुकडे यांनी दिली. हा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केल्यानंतर प्रतिवेदन आणि मंजुरीचे अधिकार स्थायी समितीच्या सदस्यांनी एकमताने स्थायी समिती सभापतींना प्रदान केले. विशेष म्हणजे अर्थसंकल्पात पंडित दीनदयाल उपाध्याय, पथ अंत्योदय योजनेअंतर्गत शैक्षणिक सहल, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी आणि इतर घटकांना सवलत देण्याकरिता 50 लाख रुपयांची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना यापुढे शहर बस सेवेअंतर्गत सवलत देण्यात येणार आहे.