मुंबई / जळगाव –केंद्रात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येण्यासाठी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे लोकसभा निवडणुकीची सूत्रे देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, त्यासाठी या दोघांना माहित असलेला लोकसभा निवडणुकीचा राज्यनिहाय ‘अर्थ’ व संख्याबळाचे ‘गणित’ जमविण्यातील त्यांचा हातखंडा या बाबीही तेवढ्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत, अशी माहिती भाजापामधील सूत्रांनी दिली. केंद्रात 2019 मध्ये भाजपाचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीत भाजपाचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पक्षातील मोदी व शाहा विरोधकांनी उचल खात केंद्रात पुन्हा भाजपाची सत्ता यायची असेल, तर 2019 मधील लोकसभा निवडणुकीचे नेतृत्त्व या दोघांकडे देऊ नये, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, लोकसभेचे एकूणच ‘गणित’ लक्षात घेता ते पेलविण्याची ‘ताकद’ कुणात आहे? दुसरीकडे, या दोघांच्या कार्यशैलीमुळे पक्ष‘परिवारा’त निर्माण झालेली नाराजी दूर करता येईल पण नेतृत्त्व दुसर्याच्या हातात देऊन पराभवाला सामोरे जायचे का?असा प्रश्न निर्माण झाला. तसेच काँग्रेस राहुल गांधी यांचा चेहरा जनतेसमोर ठेवत निवडणूक लढवित आहे. या रणनीतीला मात देण्यासाठी भाजपाकडूनही चेहरा देणे आवश्यक झाले आहे. अशावेळी मोदी व शाहा यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे मत पक्षात व्यक्त झाले. निवडणूक निकालानंतर तेव्हाची राजकीय स्थिती लक्षात घेऊन पक्ष‘परिवारा’तून पंतप्रधानपदासाठी कदाचित दुसरा चेहरा दिला जाऊ शकतो. अर्थात या जर-तरच्या गोष्टी आहे. त्यामुळे त्यावर आता कोणतेही भाष्य ठामपणे करणे शक्य नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
पक्षाने छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातील पराभवाचे आत्मचिंतन केले. सत्ता असताना कार्यकर्ता उपेक्षित राहू नये. मध्य प्रदेशात अगदी थोड्या फार मतांच्या फरकाने भाजपाचे उमेदवार पडले आहेत. यामागे कार्यकर्त्यांची नाराजी, अँटी इन्कमबन्सी कारणीभूत ठरली. महाराष्ट्रात 2019 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. दोन राज्यातील अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्रात सुधारणा करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.
350 जागांचे लक्ष्य
लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीत भाजपाला 282 जागा मिळाल्या होत्या. हा पक्षासाठी एक ऐतिहासिक विजय ठरला. 2019 मधील निवडणुकीसाठी पक्षाने 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी किमान 250 जागा 100 टक्के निवडून येतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे. केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजना, घेतलेले महत्त्वाचे निर्णय यामुळे उद्योग जगतासह सर्वसामान्य नागरिकांनाही अजून पाच वर्षे मोदी हवेत आहेत. त्याचाही पक्षाने विचार केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गडकरींचे नाव हेतूतः पुढे आणले?
मोदी व शहा यांच्या नेतृत्त्वात दोन राज्यात पराभव झाल्यानंतर पक्षातील काहींनी पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांचे नाव पुढे केले. यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचेही नाव समोर आले होते. चव्हाण आज पराभूत मुख्यमंत्री आहेत, तर गडकरी यांनी स्वतःहून या पदासाठी इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. 2014 मध्ये भाजपाचे सरकार स्थापन होण्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह यांची नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होती. आज या व्यक्ती कुठे आहेत? गडकरींचे नाव मुद्दाम समोर आणले गेले का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना आहे.